पुण्यातील पूरस्थिती गंभीर नागरिकांनी सतर्कता बाळगावी : खासदार गिरीश बापट

Share this News:

पुणे ता. ५. धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणे भरली आहेत. धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्यांना महापूर आला आहे. पुढील काही तास हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला असून नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले आहे.

बापट म्हणाले की,  गेले काही दिवस धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे शंभर टक्के भरली असल्याने पाण्याचा विसर्ग वाढवावा लागत आहे.  शेवटची माहिती माझ्याकडे आली तेव्हा खडकवासला धरणातून 45474 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने नदी पात्रालगत असलेल्या पाटील इस्टेट, मंगळवार पेठ, विश्रांतवाडी,शांतीनगर वसाहतीमध्ये पाणी शिरल्यामुळे जवळपास एक हजार बाधित कुटुंबांना अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाळा, समाज मंदिर अशा सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. अशी माहिती मला प्राप्त झाली आहे.

 सध्या संसदेचे अधिवेशन सुरु असून बापट दिल्ली येथे आहेत. तरीही परिस्थितीवर लक्ष ठेऊन महापालिका पदाधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहे.

 या आपत्कालीन स्थितीमध्ये नागरिकांना प्रशासनाच्या  वतीने सर्वतोपरी मदत केली जात आहे. मात्र नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नद्यांची पाणी पातळी जास्त आहे. कोणत्याही क्षणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने पूर पाहण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी पाण्याजवळ न जाता सुरक्षितता बाळगावी. असे आवाहन बापट यांनी या प्रसिद्धी  माध्यमातून केले आहे.