Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

आपल्या नृत्य माध्यमाचा आदर करत भरारी घ्या ! – इशिरा पारीख

Share this News:

पुणे दि. २७ मे २०१९ : “जर आपल्याला नृत्य दिग्दर्शन क्षेत्रात भरीव काम करायचे असेल, तर प्रथम आपण आपल्या नृत्य माध्यमाचा मनापासून आदर करणे गरजेचे आहे. भरतनाट्यम्, कथक, ओडिसी, मणिपुरी किंवा अन्य कोणताही नृत्य प्रकार असला तरी त्यावर पूर्ण श्रद्धा असायला हवी. आपल्या नृत्याच्या माध्यमातच असीम क्षमता आहेत. फक्त त्या चोखंदळण्याची हिम्मत आपल्यात हवी.” असे प्रतिपादन प्रसिद्ध कथक कोरीओग्राफर इशिरा पारीख यांनी केले.

प्रसिद्ध कथक गुरु शमा भाटे यांच्या नादरूप कथक संस्था, महाराष्ट्र कल्चरल सेंटर व प्रांज फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट २०१९’ या दोन दिवसीय महोत्सवाच्या समारोप प्रसंगी पारीख बोलत होत्या. हिराबाग चौक येथील ज्योत्स्ना भोळे सभागृहात सदर महोत्सव पार पडला. यावेळी कथक गुरु शमा भाटे, प्रसिद्ध भरतनाट्यम् कलाकार डॉ. सुचेता भिडे चापेकर, वैभव आरेकर, शर्वरी जमेनीस आदी उपस्थित होते.

कोरिओग्राफीचा खरा अर्थ सर्वांसमोर यावा व त्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने या उद्देशाने ‘मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट २०१९’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शनिवार रोजी यानंतर कथक गुरु शमा भाटे यांच्या शिष्या अवनी गद्रे यांनी ‘द मोअर यू सी, द लेस यू नो, फॉर शुअर’ या म्हणीवर, भरतनाट्यम् गुरु दीपक मुजुमदार यांचे मुंबई येथील पवित्र भट यांचे ‘ओगट्टी नल्ली बलविदे’ या म्हणीवर तर पुण्यातील कथक नृत्यांगना शांभवी दांडेकर यांच्या शिष्या अमृता गोगटे यांचे ‘इव्हन इफ यू कम आउट ऑफ वन केज, अरन्ट यू इन जस्ट अनदर वन ?’ या म्हणीच्या आधारे सादरीकरण झाले. तर रविवार रोजी कथक गुरु पं. राजेंद्र गंगाणी यांच्या शिष्या स्वाती सिन्हा यांचे ‘द क्लॉक डझन्ट मेक अ माँक’ या म्हणीवरील तर भरतनाट्यम् गुरु वैभव आरेकर यांच्या शिष्या स्वरदा दातार (पुणे) यांचे ‘अपिअरन्स कॅन बी डिसेप्टिव्ह’ या म्हणीवर नृत्यसादरीकरण झाले. उत्तोरोत्तर रंगत जाणाऱ्या या महोत्सवाने नृत्य रसिकांना भारावून टाकले. उत्तरार्धातील शहा व पारीख यांच्या मार्गदर्शनाने तर चारचाँद लावले.

शाह व पारीख यांनी आपल्या विविध नृत्य दिग्दर्शनांमध्ये कधी स्वलिखित कविता, कधी गद्य तर कधी अगदी पारंपरिक लोक वाद्य, लोक कला यांचाही उपयोग करून कथक नृत्याविष्कार सादर केला आहे. तर कधी सकाळी व्यायम करणारा मुलगा कथक मधून कसा दाखवता येईल, चौकोनी, आयताकार, गोल, पायऱ्यांवर नृत्य कसे सादर केले जाऊ शकते असे यशस्वी नृत्यदिग्दर्शनाचे प्रयोग उपस्थित रसिकांसमोर मांडले. यावेळी त्यांनी आपल्या जुन्या नृत्यदिग्दर्शनाच्या व्हिडीओ क्लिप्स दाखवून त्यावर चर्चा देखील केली.

याविषयी शाह म्हणाले, “आमचे कथकमध्ये बरेच सादरीकरण करून झाले होते. त्यामुळे त्यापुढचे एक पाऊल टाकत आम्ही कोरिओग्राफी करायचे ठरविले. त्यात आमची स्वतःची शैली, संवेदनशीलता आणि तार्किकता यांचा समावेश करत आपल्याला जे आणि जसे मांडावेसे वाटते ते स्वतःच्या मार्गाने मांडायचे, आपले काम हे रसिकांना गुंतवून ठेवणारे आणि प्रभावी करायचे, मांडणी गुंतागुंतीची न करता साधी सोपी करत नृत्याच्या खोलात शिरायचे ठरविले आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करीत गेलो. शास्त्रीय नृत्य काय हे आपल्याला माहिती असले तरी प्रेक्षकांना समजेलच असे नाही, त्यामुळे त्यांना सहज समजेल व भावेल असे सादरीकरण हवे हे ध्यानात ठेवत नृत्यदिग्दर्शन करायचे हा नियम आम्ही नेहमी पाळला.”

यावेळी नृत्याबरोबरच संगीत, नाट्य, प्रकाशयोजना, समीक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी या महोत्सवात सादर झालेल्या नृत्य दिग्दर्शनावर आपली मते मांडली. यावेळी या पॅनेलमध्ये गुरु शमा भाटे, वैभव आरेकर, शर्वरी जमेनीस, अजय जोशी (समीक्षक), चैतन्य आडकर (संगीत), प्रदीप वैद्य (नाट्य) यांबरोबरच अहमदाबाद येथील आघाडीचे कोरीओग्राफर मौलिक शहा व इशिरा पारीख आदी उपस्थित होते.

Follow Punekar News: