Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

उत्कृष्ट ग्राहकसेवा, वीजबिलांच्या वसुलीला सर्वोच्च प्राधान्य द्या

पुणे, दि. 06 जून 2019 : गेल्या 14 वर्षांमध्ये महावितरणने वीज वितरणातील सर्वच घटकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विजेच्या भारनियमनाचा प्रश्न संपुष्टात आला आहे व इन्फ्रास्ट्रक्चरच्या विविध प्रकल्पांमुळे वीज वितरण यंत्रणा सक्षम झाली आहे. त्यामुळे यापुढे आणखी उत्कृष्ट ग्राहकसेवा व विजबिलांच्या वसुलीसाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी केले.

महावितरणच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि. 6) रास्तापेठ येथील प्रशासकीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता श्री सुंदर लटपटे, श्री. राजेंद्र पवार, श्री. पंकज तगलपल्लेवार, श्री. वादिराज जहागिरदार, सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र म्हकांळे (मानव संसाधन) व सौ. माधुरी राऊत (वित्त व लेखा) यांची उपस्थिती होती.

मुख्य अभियंता श्री. तालेवार म्हणाले, तत्कालिन विद्युत मंडळाचे विभाजन झाल्यानंतर वितरण, निर्मिती व पारेषणमध्ये अधिक फोकस पद्धतीने काम झाले. सामाजिक बांधिलकी जपत महावितरणने विविध योजनांद्वारे केवळ विजेच्या भारनियमनावर मातच केली नाही तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून सक्षम वीजयंत्रणा देखील उभारली आहे. गेल्या 14 वर्षांत सर्व वर्गवारीतील सुमारे सव्वा कोटी वीजग्राहकांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तब्बल 24 हजार मेगावॉट विजेची मागणी भारनियमनाशिवाय पूर्ण करणारी सक्षम वितरण यंत्रणा उभारली आहे. हे सर्व महावितरणच्या कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ व्यवस्थापन या सर्वांच्या सहभागातून शक्य झाले आहे. वीजग्राहकांसाठी सर्व ग्राहकसेवा ऑनलाईन व मोबाईल अ‍ॅपद्वारे एका क्लिक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सेंट्रलाईज बिलींगमुळे वीजबिलेही अचूक होत आहेत, असे श्री. तालेवार यांनी सांगितले.

यावेळी अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्ग पवार यांनी महावितरणच्या प्रगतीचा आलेख सर्वांसमोर मांडला. सार्वजनिक कंपनी म्हणून महावितरणने केलेली प्रगती ही सांघिक कामांमुळेच शक्य झाल्याचे ते म्हणाले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी श्री. विजय हिंगमिरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. रामगोपाल अहिर यांनी केले. यावेळी कार्यकारी अभियंता श्री. मधुकर घुमे, श्री. रवींद्र बुंदेले, श्री. चंद्रकांत डामसे आदींसह अभियंते, अधिकारी, विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, कर्मचारी उपस्थित होते.