उद्योगाच्या विकासासाठी ग्लोबल व्हिजन ठेवणे आवश्यक – केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू
नवी मुंबई : भारतातील उत्पादनाला जागतिक बाजारपेठ मिळाल्याशिवाय उद्योगाचा विकास होणार नाही. याच संकल्पनेतून ग्लोबल कोकण महोत्सवाची सुरुवात झाली आहे. उद्योगाचा विकास हा पायाभूत सुविधांवर अवलंबून असून गेल्या तीन वर्षात कोकणात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
आज नवी मुंबईतील वाशी येथे कोकण भूमी प्रतिष्ठान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मेक इन इंडिया आयोजित 6 व्या ग्लोबल कोकण महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार सर्वश्री भाई जगताप, संदीप नाईक, प्रसाद लाड, सुनील शिंदे, माजी आमदार मंगेश सांगळे, प्रमोद जठार, ग्लोबल कोकणचे प्रमुख कार्यवाहक संजय यादवराव, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, माजी मुख्य सचिव द.म.सुखटणकर आदी उपस्थित होते.
प्रभू म्हणाले की, कोकण रेल्वेचे गेल्या तीन वर्षात रूप बदलले असून 23 नवीन स्थानके निर्माण करण्यात आली. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग येथील पायाभूत सेवांचा विकास करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. आयुषची नवीन केंद्र सिंधुदूर्ग, रायगड, रत्नागिरी येथे सुरु करण्यात येणार आहेत. टुरीझमची संस्था कोकणात सुरु करण्यात येणार आहे. तरुणांना संधी मिळण्यासाठी स्टार्टअप कार्यक्रम कोकणात सुरु करण्यात येणार आहे. मेक इन इंडिया प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात होण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.
श्री. गीते म्हणाले की, पर्यटनाच्या जागतिक नकाशावर कोकणला आणण्यासाठी पर्यटन उद्योगाला चालना देणे आवश्यक आहे. ग्लोबल कोकण महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. जगातील अनेक देशाची इकॉनॉमी पर्यटनावर आधारित आहे. यशस्वी उद्योग पर्यटन उद्योग आहे. त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतात. राज्य शासनाने पर्यटन उद्योगाला चालना दिलीच पाहिजे.
पर्यटनमंत्री रावल म्हणाले की, ग्लोबल कोकण या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोकणातले वैशिष्ट्य मुंबई सारख्या आर्थिक राजधानीतून जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून फलोत्पादन, पर्यटन, लोककला, खाद्यपदार्थ याला जागतिक व्यासपीठ मिळत आहे. कृषि क्षेत्र, मत्स्य क्षेत्र, बंदर क्षेत्र यात अनेक संधी आहेत. मेक इन इंडिया या कार्यक्रमात सर्वांत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. कोकणातील पर्यटनाचा प्रचार व प्रसार ही पर्यटन विभागाची जबाबदारी आहे.
ग्लोबल कोकणचे प्रमुख कार्यवाहक संजय यादवराव यांनी प्रास्ताविकात, कोकणातील लोकांना, खासकरून तरुणांना वेगवेगळ्या नोकरी आणि व्यवसाय संधीचे शिक्षण देणे, मार्गदर्शन करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. कोकणातील गावामध्ये व्यवसाय करणे आणि शहरातील तरुणांसाठी गावातच नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे ही यामागची संपूर्ण संकल्पना आहे, असे सांगितले.