एसएसके सखी दिवाळी फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे: ७ ऑक्टोबर: गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या (जेबीजीव्हीएस) आकुर्डीतील समाज सेवा केंद्रात आयोजित केलेल्या सखी दिवाळी फेअर मधील विविध स्टॉलना भरगोस प्रतिसाद मिळत आहे. बचत गटांतील महिलांनी केलेल्या वस्तू व फराळाचे पदार्थ यांचा आस्वाद घ्यायला महिला, मुले व संपूर्ण परिवारासोबत लोकं मोठ्या संख्येने येत आहेत. ग्राहकांना दिवाळी खरेदीचा आनंद व गरजू महिलांना उत्पन्न असा दुहेरी उद्देश यातून साध्य होतो.
“महिलांनी आंतरिक शक्ती प्रगट करावी”
फेअरचे उद्घाटन ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजता संपन्न झाले. या प्रसंगी ज्येष्ठ रोटेरियन श्रीमती लीना केरकर (प्रमुख पाहुण्या), मुक्तांगणच्या समन्वयक श्रीमती प्रफुल्ला मोहिते (कार्यक्रमाच्या अध्यक्षा), बजाज ऑटोचे महाव्यवस्थापक-सीएसआर श्री पंकज बल्लभ, जेबीजीव्हीएसचे संचालक कर्नल विनोद देशमुख व संस्थेचे सचिव पार्था सारथी मुखर्जी उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्रीमती केरकर म्हणाल्या की घरात मुलीचा जन्म झाल्यावर तिचे आनंदाने स्वागत करून तिचे योग्य संगोपन केले पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन ती एक यशस्वी महिला म्हणून उदयास येईल.
समाज सेवा केंद्राच्या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करताना श्रीमती मोहिते पुढे म्हणाल्या, “महिलांनी त्यांची आंतरिक शक्ती ओळखून ती प्रगट केली पाहिजे. यातूनच सर्व संकटांवर मात करून स्वतःची व परिवाराची प्रगती साधता येते.” उद्घाटन सोहळ्या इतक्याच उत्साहात दुसऱ्या दिवशी मंगळागौरीचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
दिवाळी खरेदी व खाद्य मेजवानी
उत्तम गुणवत्ता व विविधता यांमुळे सखी फेअरला उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद मिळतो आहे. पूर्वी १५-२० स्टॉल पासून सुरु होऊन आता स्टॉलची संख्या ७० पर्यंत पोहोचली आहे. या वर्षी, प्रदर्शनात आकुर्डी-निगडी परिसरातील बचत गटांतील महिलांनी बनवलेल्या रास्त किमतीतील चांगल्या दर्जाच्या हस्तकला वस्तू, कपडे, दागिने, पर्स, बॅग, फ्रेम, स्वेटर, घर सजावटीचे साहित्य, उटणे, रांगोळी, आकाश कंदील, दिवे, भेट वस्तू, मसाले व फराळाचे पदार्थ उपलब्ध आहेत. त्याच बरोबर, खेड व मावळ तालुक्यांतील प्रत्येकी एक स्टॉल धान्ये व कडधान्यांची विक्री करत आहे. खान्देश, पश्चिम महाराष्ट्र व कोकण अशा राज्यातील विविध भागातील खाद्य पदार्थांचे स्टॉलही आहेत.
फेअरचे अजून दोन दिवस (९ ऑक्टोबर पर्यंत) शिल्लक असून रोज सकाळी १० ते रात्री ८.३० पर्यंत हे प्रदर्शन ग्राहकांना खरेदीचा आनंद द्यायला सिद्ध असेल. तिसऱ्या दिवशी विविध खेळ आयोजित करण्यात आले आहेत, तर चौथ्या दिवशी नृत्याचा कार्यक्रम व लकी ड्रॉ (सोडत) असे कार्यक्रम असतील. सर्व करमणुकीचे कार्यक्रम दुपारी ४ वाजता असतील व सर्व स्टॉल धारक/ग्राहकांसाठी खुले असतील.