कर्नल सुरेश पाटील यांना जयंतराव टिळक पुरस्कार जाहीर

Col Suresh Patil
पुणे, २ सप्टेंबर – पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा मानाचा कै. जयंतराव टिळक पुरस्कार वर्ष २०१५ साठी पर्यावरण कार्यकर्ते आणि ‘ग्रीन थम्ब’ या संस्थेचे संस्थापक कर्नल सुरेश पाटील यांना जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल व रोप असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पाटील यांच्यासह वर्ष २०१६ साठी आनंद चोरडिया आणि वर्ष २०१४ साठीचा पुरस्कार प्रा. हेमा साने यांना देण्यात येईल. महापौर प्रशांत जगताप यांनी नुकतीच या पुरस्कारांची घोषणा केली.
फुले, फळे, उद्यान आणि वनीकरण या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा पुणे महानगरपालिकेच्या वतीने दर वर्षी विधान परिषदेचे माजी सभापती कै. जयंतराव टिळक यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. कर्नल सुरेश पाटील यांनी खडकवासला धरणातील गाळ काढून तेथील जलाशयाची पाणी साठवण क्षमता वातविण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. त्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येईल. या पुरस्कारांचे लवकरच वितरण करण्यात येईल, असे जगताप यांनी सांगितले.