‘गुलाबजाम’च्या पंगतीचे गोड निमंत्रण

just pune things app
Share this News:

– चित्रपटाच्या प्रसिद्धीची हटके कल्पना
– गुलाबजामच्या पंगतीच्या निमंत्रणासाठी 11 हजार गुलाबजामचे वाटप

पुणे, दि.12 फेब्रुवारी – पुणेकर नागरिक अनेक कारणासाठी सुप्रसिद्ध आहेत. त्यामध्ये खवय्येगिरीचाही समावेश आहे. कोणते चविष्ट पदार्थ कुठे खावेत याचे प्रशिक्षण पुणेकर देतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रातील तमाम खवय्येगिरी करणाऱ्या सिनेरसिकांसाठी लवकरच झी स्टुडिओज एक टेस्टी चित्रपट ‘गुलाबजाम’ घेऊन येत आहे.

सचिन कुंडलकर लिखित आणि दिग्दर्शित ‘गुलाबजाम’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अतिशय हटके प्रमोशन सध्या सुरू आहे. रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त गाठत चित्रपटगृहात चित्रपट पहायला आलेल्या सिनेरसिकांना येत्या 16 फेब्रुवारी पासून संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेला ‘गुलाबजाम’ चित्रपट पहायला यायचं हं! असे निमंत्रण चक्क गुलाबजाम खायला घालून देण्यात आले, पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड, सिटी प्राईड सातारा रस्ता आणि अभिरुची सिटी प्राईड या चित्रपटगृहात सिनेमा पाहायला आलेल्या सुमारे 11 हजार प्रेक्षकांना एका टेस्टी सिनेमाला येण्याचे हे गोड निमंत्रण देण्यात आले. प्रेक्षकांना हे आगळे वेगळे निमंत्रण भावले आणि अनेक प्रेक्षकांनी या स्वादिष्ट सिनेमाचा आस्वाद घेणारच असल्याची ग्वाही दिली. गोड अशा ‘गुलाबजाम’ची पंगत येत्या शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात बसणार आहे.