Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

गो-ग्रीन’मधून महावितरणचे लाखांवर वीजग्राहक झाले पर्यावरणस्नेही

मुंबई, दि. 16 मार्च 2020 : वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ या पर्यावरणपुरक योजनेत आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक पर्यावरणस्नेही ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागातील सर्वाधिक 40 हजार वीजग्राहकांचा समावेश आहे.

महावितरणकडून ‘गो-ग्रीन’ योजनेत छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांची वार्षिक 120 रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय वीजबिल ‘ई-मेल’ तसेच ‘एसएमएस’द्वारे दरमहा मिळणार असल्याने ते लगेचच प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध होत आहे. तसेच वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय आहे. यासोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर वीजबिल मूळ स्वरुपात उपलब्ध असून ते डाऊनलोड किंवा प्रिंट करण्याची सोय आहे.

महावितरणमध्ये आतापर्यंत 1 लाख 3 हजार 918 वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागातील 40069 ग्राहकांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. त्यानंतर कोकण प्रादेशिक – 37800, नागपूर प्रादेशिक – 13717 आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागातील 12332 वीजग्राहकांचा समावेश आहे. परिमंडलनिहाय पर्यावरणस्नेही ग्राहकांची संख्या पुढीलप्रमाणे: पुणे परिमंडल- 24975, बारामती- 8330, कोल्हापूर- 6764, नागपूर- 4249, गोंदिया- 1288, चंद्रपूर- 1414, अमरावती- 2927, अकोला- 3839, नाशिक- 10583, कोकण- 2161, कल्याण- 10132, जळगाव- 5394, भांडूप- 9530, औरंगाबाद- 5310, लातूर- 4035 आणि नांदेड परिमंडलात 2987 वीजग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ला पसंती दिली आहे व पर्यावरणपुरक कामात योगदान दिले आहे.

‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडण्यासाठी वीजग्राहकांनी वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरणपुरक योजनेमध्ये योगदान द्यावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.