डॉक्टरांनो निर्भयपणे रुग्णसेवा करा!
– महापौर नितीन काळजे यांचा दिलासा
– ‘वायसीएम’ मधील निवासी डॉक्टरांची बैठक
पिंपरी- महापालिका प्रशासनाच्या वतीने चालविण्यात येणा-या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) डॉक्टरांनी निर्भयपणे काम करावे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. भारतीय जनता पक्ष आणि महापालिका प्रशासन आपल्यासोबत ठामपणे आहे, असे आश्वासन महापौर नितीन काळजे यांनी दिले.
राज्यातील डॉक्टरांवर होणा-या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांनी संप पुकारला आहे. त्यामध्ये वायसीएममधील निवासी डॉक्टरांनीही सहभाग घेतला. परिणामी, रुग्णसेवा कोलमडली होती. विशेष म्हणजे, रुग्णालयात काम करीत असताना राजकीय दबावाला बळी पडावे लागते, असा सूर डॉक्टरांचा होता. त्यापार्श्वभूमीवर महापौर नितीन काळजे यांनी वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची शुक्रवारी भेट घेतली. तसेच, डॉक्टरांच्या विविध मागण्यांबाबत महापालिका प्रशासनाला तात्काळ आदेश दिले आहेत. यावेळी महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय उपस्थित होते.
महापौर नितीन काळजे म्हणाले की, वायसीएमच्या अपघात विभागात २४ तास पाच सुरक्षारक्षक तैनात करावेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक रुग्णासोबत दोन नातेवाईकांनाच रुग्णालयात प्रवेश देण्यात यावा. प्रवेश पास संदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच, रुग्णालयात ‘इर्मजन्सी अलार्म’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. नशापान करुन कोणत्याही व्यक्तीला रुग्णालयात प्रवेश दिला जाणार नाही. निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनाबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा करण्यात येईल.
निवासी डॉक्टरांमध्ये समाधान….
राज्यातील डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. तसेच, आम्हाला राजकीय दबावाखाली काम करावे लागते. मात्र, नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांनी तात्काळ संपकरी डॉक्टरांची बैठक घेतली. आमच्या अपेक्षा आणि तक्रारी आपुलकीने जाणून घेतल्या. तसेच, प्रशासकीय पातळीवर आदेशही दिले. त्यामुळे वायसीएममधील निवासी डॉक्टरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.