थकबाकीदारांनो! वीजबिल भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित होणार

just pune things app
Share this News:

दि. 24 व 25 ला वीजबिल भरणा केंद्र सुरु

पुणे, दि. 23 मार्च 2018 : वारंवार आवाहन केल्यानंतरही वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा न करणार्‍या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम शनिवारी (दि. 24) व रविवारी (25) या सुटीच्या दिवशीही सुरुच राहणार आहे. थकबाकीचा भरणा करता यावा यासाठी वीजग्राहकांना ‘ऑनलाईन’ पेमेंटची सोय आहे तसेच महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत.

पुणे, पिंपरी शहरासह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांतही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे. महावितरणच्या संबंधित कार्यालयांतील अधिकारी व कर्मचार्‍यांसह वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. थकबाकीमुळे महावितरणसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र दि. 24 व 25 मार्चला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्रांसह www.mahadiscom.inही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा अंतीम मुदतीपूर्वी व मागील महिन्यांतील थकबाकीच्या रकमेचा तात्काळ भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.