प्रत्येकाला मिळणार स्वप्नातील घर

Share this News:

मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ परिसरातील प्रत्येक झोपडपट्टीवासियाला घर मिळणार असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

एस.आर.ए.(झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) व एम.आय.ए.एल. (मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्या.) च्या माध्यमातून संदेशनगर व क्रांतीनगरातील पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या घरांच्या चाव्या वाटप कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी खासदार पूनम महाजन, आमदार सर्वश्री आशिष शेलार, पराग अळवणी, ‘जिव्हीके’चे मुख्याधिकारी राजीव जैन, एसआरएचे मुख्याधिकारी दीपक सावंत आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेआजचा दिवस संदेशनगर व क्रांतीनगरातील नागरिकांसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. यापूर्वी घराची केवळ स्वप्ने दाखवली जात होती. मात्र आता घरापासून कुणीही वंचित राहणार नाही. प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर‘ देण्याचा निर्धार केला केला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कुणीही बेघर राहणार नाही. आज काही पात्र रहिवाशांना घराची चावी मिळालीमात्र जोपर्यंत प्रत्येकाला घराची चावी मिळणार नाही तोपर्यंत हा चावी वाटपाचा कार्यक्रम संपणार नाही. २००० नंतरच्या ज्या लाभार्थ्यांना अपात्र ठरवले गेले होते, अशा २००० ते २०११ दरम्यानच्या विमानतळ परिसरातील रहिवाशांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र ठरवून त्यांना हक्काचे घर मिळवून दिले जाईल. ज्यांना कागदपत्रांअभावी अपात्र ठरवले गेलेअशा नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्णवेळ प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल.

धारावीदेखील झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी केंद्राकडून रेल्वेची ४५ एकर जागा मिळवण्यातही राज्य शासनाला यश आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान खासदार श्रीमती महाजन यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या संविधान वाटप कार्यक्रमांतर्गत नागरिकांना संविधानाच्या प्रतींचे यावेळी वाटप करण्यात आले.