महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘रोगांची कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांविषयी समग्र दृष्टिकोन’ या विषयावर अमेरिकतील आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर !

Share this News:

मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम करणार्‍या आध्यात्मिक गोष्टी आधुनिक वैद्यकशास्त्र नाकारते; मात्र आयुर्वेद रोगाचे निदान आणि उपचार या दोन्ही स्तरांवर आध्यात्मिक आणि सूक्ष्म पैलूंचा विचार करते. अध्यात्म आणि वैद्यकशास्त्र यांत समान दुआ काय आहे, याचा अभ्यास झाल्यास रोगांचे निदान, उपचार आणि प्रतिबंध अधिक प्रभावी होऊ शकेल का, यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने पारंपारिक (वैज्ञानिक) आणि अपारंपारिक (सूक्ष्म-ज्ञान) पद्धतींनी केलेल्या संशोधनात अध्यात्म आणि वैद्यकशास्त्र यांत थेट संबंध असल्याचे स्पष्ट झाले, असे प्रतिपादन श्री. सोमनाथ परमशेट्टी यांनी अमेरिकेत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर करतांना केले.

13 ते 15 एप्रिल 2018 या कालावधीत सेंट लुई, मिजोरी, अमेरिका येथे ‘वैद्यकशास्त्र आणि धर्म’ या विषयावर झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेला हार्वर्ड विश्‍वविद्यालयाने विशेष परिषदेचा दर्जा दिला आहे. या परिषदेचे आयोजन ‘इन्स्टिट्यूट फार स्पिरिच्यूएलिटी अ‍ॅन्ड हॅल्थ’, टॅक्सास मेडिकल सेंटर, ह्युस्टन, अमेरिका यांनी केले होते. या परिषदेत ज्यू, ख्रिस्ती, मुसलमान, सूफी, बौद्ध आणि हिंदु धर्म यांतील तत्त्वज्ञान, साधना अन् चमत्कार यांवर आधारित शोधनिबंध सादर करण्यात आले. 14 एप्रिल या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘रोगांची कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांविषयी समग्र दृष्टिकोन’ या विषयावर महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे प्रणेते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि या विद्यालयाचे अमेरिकेतील प्रतिनिधी श्री. सोमनाथ परमशेट्टी यांनी लिहिलेला शोधनिबंध श्री. परमशेट्टी यांनी सादर केला.

रोगाचे निदान आणि उपचार होण्यासाठी त्याच्या मुळाशी जाणे अनिवार्य असते. कोणत्याही रोगाची ३ संभाव्य कारणे असू शकतात, असे संशोधनात निष्पन्न झाले आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक, ही ती तीन कारणे होत. कोणताही रोग यापैकी एक किंवा अनेक कारणांमुळे होत असतो. वैद्यकीय आजार यासह जीवनातील बहुतेक समस्यांमागील मूलभूत कारण प्रारब्ध हे असते. यासह वाईट शक्ती, पूर्वजांचे सूक्ष्म देह इ. आध्यात्मिक कारणांमुळे शारीरिक (उदा. त्वचारोग) किंवा मानसिक (उदा. व्यसनाधीनता) आजार होऊ शकतात. त्यामुळे रोगांचे निदान करतांना खरेतर डॉक्टरांनी तिन्ही मूलभूत कारणे लक्षात घेऊन त्यानुसार उपचार करायला हवे. उदा. एखाद्या रोगाचे मूळ कारण प्रारब्ध किंवा वाईट शक्तींचा त्रास हे असेल, तर शारीरिक आणि मानसिक उपचारांना आध्यात्मिक उपचारांची जोड देणे आवश्यक असते. असे केल्याने रोगाचे पूर्ण निवारण होते. याउलट फक्त शारीरिक आणि मानसिक उपचार केल्याने रोगाची केवळ लक्षणे दूर होतात, असे संशोधनाअंती निरिक्षणास आले.

आध्यात्मिक स्तरावरील उपचारांच्या अंतर्गत साधना अर्थात नित्य उपासना हा सर्वोत्तम उपाय आहे. साधना केल्याने प्रारब्धावर मात करता येते किंवा ते निदान सुसह्य तरी होते. रोगाचे मूलभूत कारण आध्यात्मिक असलेल्या रोगांचे निवारण आध्यात्मिक उपायांनी झाल्याची सहस्रो उदाहरणे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन विभागाकडे उपलब्ध असल्याचेही श्री. परमशेट्टी यांनी या वेळी सांगितले.