महाराष्ट्राचे तुकडे करण्याचीच संघाची आणि भाजपची भूमिका –जयंत पाटील
मुंबई- दि-२२ : महाराष्ट्राचे चार राज्यात विभाजन करा अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सल्लागार मा. गो. वैद्य यांनी मांडली आहे. या भूमिकेवर राष्ट्रवादीचे विधानसभा गटनेते जयंत पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला. महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याचे संघाचे स्वप्न आहे. हीच भूमिका भाजप सरकारचीही आहे, असा आरोप पाटील यांनी केला. निवडणुकांपूर्वी ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा‘ अशी जाहीरात करणाऱ्या भाजपलाच आता ‘कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र आमचा‘ असे विचारण्याची वेळ आली आहे, अशी टीका पाटील यांनी केली.
महाराष्ट्राचे चार तुकडे करून मुंबईच्या रूपाने पाचवा तुकडा भाजपला करायचा आहे. मुंबईला केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव आहे. महाराष्ट्र हा एकसंध राहीलाच पाहीजे. अनेक पिढ्या त्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवाय बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. पण संघ जे बोलत आहे तेच महाधिवक्ता श्रीहरी अणे बोलले. त्यामुळे एकसंध महाराष्ट्राला तोडण्याची कोणी भाषा करत असेल आणि त्याला सरकारची साथ मिळत असेल तर त्यातून सरकारची भूमिकादेखील समजते, असे पाटील म्हणाले. मात्र महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणाऱ्यांच्या मागे कोणी उभे राहणार नाही. विदर्भातील बहुतांश लोकांना संयुक्त महाराष्ट्रातच राहायचे आहे. मात्र मराठी भाषिक राज्याची शकले करण्याचे आणि मराठी एकजूट तोडण्याचे संघाचे हे कारस्थान असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
राज्यातील विविध समस्या सोडवण्याऐवजी राज्याचे तुकडे करण्यातच या सरकारला अधिक रस आहे. लोकांचे मन विचलीत करण्याचा हा प्रयत्न आहे. श्रीहरी अणे यांनी राजीनामा दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. त्यावेळी अणेंनी वेगळ्या मराठवाड्याबाबत केलेल्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली. पण वेगळ्या विदर्भाबाबतही याआधी अणे यांनी वक्तव्य केले आहे. त्याबाबतची आपली भूमिका मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहेत आहेत का अशी शंका निर्माण होत असल्याचे, पाटील म्हणाले.