राज्यातील दुष्काळाकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष – जयंत पाटील

Share this News:

–  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेत स्थगन प्रस्ताव


मुंबई- दि-२२ : 
मंत्रालयात एसी मध्ये बसून निष्ठूर व निष्क्रीय सरकारी अधिकाऱ्यांना गरीब शेतकऱ्यांचे दुःख व कष्ट समजणार नाहीत अशा कडक शब्दांत विधानसभेचे गटनेते आ.जयंत पाटील यांनी सरकारवर ताशेरे ओढले. दुष्काळाकडे युती सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मात्र तरीही सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसून दुष्काळ दाबण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जातो आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधीच उघड केली होती. उच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे याला पुष्टीच मिळाली असल्याचे ते म्हणाले. तरीदेखील हे सरकार जागे होण्यास तयार नाही. फक्त घोषणा करण्यावर सरकारचा भर आहे. दुष्काळी भागातील जनतेला सुविधा मिळत नसल्याने त्यांना न्यायालयात जावे लागत आहे, असे पाटील पुढे म्हणाले.

राज्यातील 6 ते 7 हजार गावे ही आजही मदतीपासून वंचित आहेत. ही गावे मदतीतून वगळण्यास कोण जबाबदार आहे,विदर्भावर अन्याय कोणी केला, या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यायला हवीत, अशी मागणीही पाटील यांनी केली. मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव स्वीकारावा अशी मागणी पाटील यांनी विधानसभेत केली. पण अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळल्यानंतर सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला.