माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नातून पानशेत पूरग्रस्तांचा ५३ वर्षे प्रलंबित प्रश्न निकाली

Share this News:

पुणे, दि. ८ मार्च, २०१९ : १९६१ मधील पानशेत महाप्रलयानंतर ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या वसाहती मालकी हक्काने देण्यास राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. त्याचा फायदा सहकारनगर भाग १ आणि २, पद्मावती या भागातील १०३ पानशेत पूरग्रस्तांच्या सोसायट्यांमधील सुमारे २०५० पूरग्रस्त कुटुंबांना होणार आहे. १ फेब्रुवारी १९७६ च्या बाजार मूल्यानुसार या जमिनींची किमत ठरविली जाणार आहे आणि १९९१ च्या प्राईम लेंडिंग रेटनुसार व्याज आकारून मालकी हक्काने त्या मिळणार आहेत. गेली अनेक वर्षे रखडलेला हा प्रश्‍न आमदार माधुरी मिसाळ यांच्या पाठपुराव्यामुळे आता मार्गी लागला आहे.

या बाबतचा निर्णय घेण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ जून २०१८ रोजी बैठक घेतली होती. त्यात पूरग्रस्त वसाहती मालकी हक्काने देण्याचे ठरले होते. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या वसाहतींमधील पूरग्रस्तांची घरे आता मालकी हक्काने होणार आहेत.

याविषयी माहिती देताना आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‘’पूरग्रस्त वसाहतीमधील संबंधित नागरिकांना भूखंड मालकी हक्काने मिळावेत, यासाठीच्या माझ्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे आनंद होत आहे. त्यासाठी सुमारे ८ वर्षे मी सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली आणि पूरग्रस्तांना न्याय दिला आहे. भाजप सरकारने या प्रश्नी लक्ष घालत तो सोडविला याचा आनंद आहेच. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री गिरीशजी बापट यांचे यानिमित्ताने मी आभार मानते.”