Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

श्री. संजय ताकसांडे महापारेषणच्या संचालक (संचालन) पदी रुजू

मुंबई, दि. २७ एप्रिल 2019 : महापारेषण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून श्री. संजय ताकसांडे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरण कंपनीमध्ये पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते.

वीजक्षेत्रातील महत्वाच्या पदांवर सुमारे 29 वर्षांचा अनुभव असलेले श्री. संजय ताकसांडे हे सन 2003 मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कार्यकारी अभियंता म्हणून मुंबई मुख्यालयात रूजू झाले. त्यानंतर ते अधीक्षक अभियंता पदावर वसई, बुलडाणा व मुख्य अभियंता म्हणून अमरावती परिमंडल, अकोला या ठिकाणी कार्यरत होते. ऑक्टोबर 2015 मध्ये थेट भरती प्रक्रियेतून श्री. संजय ताकसांडे यांची कार्यकारी संचालक (वितरण) पदी निवड झाली व त्यांच्याकडे वितरण, भारव्यवस्थापन, सामग्री व्यवस्थापन व वितरण फ्रॅचाइजी या विभागाच्या संपूर्ण जबाबदारींसह राज्यातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, पुणे, बारामती व कोल्हापूर ही परिमंडले सुध्दा त्यांच्या कार्यक्षेत्रात होती. पश्चिम महाराष्ट्राचे कार्यक्षेत्र असलेल्या महावितरणमधील पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून त्यांनी सव्वादोन वर्ष काम पाहिले आहे.

त्यानंतर नुकत्याच झालेल्या महापारेषण कंपनीच्या संचालक (संचालन) पदाच्या थेट भरती प्रक्रियेमध्ये श्री. ताकसांडे यांची निवड झाली व महापारेषण कंपनीच्या मुंबई येथील मुख्यालयात ते नुकतेच रुजू झाले. महापारेषण व महावितरणच्या सेवेत येण्यापूर्वी श्री. संजय ताकसांडे हे केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्युत प्राधीकरण, नवी दिल्ली येथे तसेच पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई या ठिकाणी कार्यरत होते.