हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण

just pune things app
Share this News:

पुणेः अतिरेक्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिग ऑफिसर हुतात्मा कर्नल संतोष महाडिक-घोरपडे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण पुणे शहराचे सहपोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सुनील रामानंद यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे श्रमिकपत्रकार संघात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमात महाडिक यांच्या पत्नी स्वाती, कुटुंबीय, मित्र परिवार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिल्पकार अभिजीत धोंडफळे यांच्या हातातून हा अत्यंत देखणा पुतळा साकारला आहे. यावेळी हा पुतळा महाडिक यांच्या पत्नी स्वाती यांच्याकडे प्रदान करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील संतोष यांच्या मूळ गावी हा अर्धपुतळा बसविण्यात येणार आहे. लष्करी गणवेश परिधान केल्यानंतर संतोष यांच्या पुतळ्याला पहिला सॅल्युट करण्याचे ध्येय स्वाती यांनी उराशी बाळगले आहे.

मुंबईवर २६-११ रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलिस अधिका-यांना ज्या पद्धतीने गौरविण्यात आले, तशाच पद्दतीने गडचिरोलीच्या जंगलामध्ये तैनात असलेल्या पोलिसांचाही सन्मान करण्यात यावा, अशी अपेक्षा सुनील रामानंद यांनी या निमित्ताने बोलताना व्यक्त केली.

या प्रसंगी भावना व्यक्त करताना स्वाती महाडिक म्हणाल्या, की सैन्यदलामध्ये सहभागी होण्यामागे माझे पती हेच माझे प्रेरणास्थान आहेत. आता मी रोज जवळपास दहा किलोमीटर धावते. मात्र, तरीही मी थकत नाही किंवा दमत नाही. कारण सैन्यदलामध्ये सहभागी व्हावे, असे संतोष यांना पाचवीत असल्यापासून वाटायचे. पुढे त्यांनी ते करून दाखविले. लष्कराचा गणवेश अंगावर चढविल्यानंतर त्यांना अत्यंत अभिमान वाटायचा आणि आपण देशासाठी काही करतो आहोत, अशी भावना मनामध्ये यायची. त्यांचाच विचार मी सैन्यदलात सहभागी होऊन पुढे नेणार आहे.

संतोष महाडिक यांच्या अर्धपुतळ्याच्या निर्मिती मागील कहाणी सांगताना विनायक बोगम म्हणाले, की आजच्या पिढीतील हजारो तरुणांनी संतोष महाडिक यांच्यापासून प्रेरणा घ्यावी. लष्करी सेवेत दाखल व्हावे आणि देशसेवा करावी, हा या उपक्रमाचा मूळ हेतू आहे. संतोष यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी स्वाती यांची कहाणी देखील तितकीच प्रेरणादायी आणि आदर्श अशीच आहे. पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या लष्करी सेवेत दाखल होणार आहेत, या बाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.

‘आजच्या युगात अशा पद्धतीचे खरेखुरे हिरो हे खूपच दुर्मिळ आहेत. स्वतःपेक्षा देशसेवा आणि देशाला प्राधान्यक्रम देणा-या संतोष महाडिक यांच्यासारख्या जवानांपासून आजच्या तरुणांनी  प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपण पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे मनोमन वाटल्यामुळेच मी अर्धपुतळ्याच्या निर्मितीची संकल्पना पूर्णत्वास नेली,’ असे बोगम यांनी पुढे सांगितले.
….

विनायक बोगम यांचा पुढाकार

विनायक बोगम हे मुक्तछायाचित्रकार आहेत. मूळचे उद्योजक असलेले बोगम हे गेल्या वीस वर्षांपासून छायाचित्रकला जोपासत आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रकाशित केलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) ‘कॉफी टेबल बुक’मधील सर्व छायाचित्र ही विनायक बोगम यांनी टिपलेली आहेत. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते २००८मध्ये या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन करण्यात आले होते. हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या अर्धपुतळ्यासाठी लागणारा सर्व निधी विनायक बोगम यांनी स्वतः दिलेला आहे. त्यांनी या साठी कोणाकडूनही मदत घेतलेली नाही.