आंदोलकांवर दगडफेक आणि आमची भूमिका

Share this News:
मुंबई विद्यापीठात आज दिनांक  २२ जानेवारी २०१६ रोजी ‘मुंबई युनिवर्सिटी स्टूडेंट्स फ्रंट’ ने रोहित वेमुला याच्या आत्महत्येविरोधात निदर्शने आयोजित केली होती.सोबतच मुंबई विद्यापीठ बंदचे आवाहन केले गेले होते. विद्यार्थ्यांनी प्रत्येक विभागात जाऊन विद्यापीठ बंदचे आवाहन केले आणि क्लासेस होऊ नयेत अशी मागणी शिक्षकांना केली. बंदला विद्यार्थ्यांचा पाठींबा मिळाला आणि विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग देखील घेतला.छात्रभारती, NSUI , राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, विद्रोही सांस्कृतिक मंच, विद्यार्थीभारती, राष्ट्रसेवा दल, अनिस अशा संघटना एकत्र येत विद्यापीठ बंदची हाक दिली गेली आणि बंद १००% यशस्वी झाला.  सुमारे ३००/३५० कार्यकर्ते या निदर्शनात सामील झाले होते.
आंदोलकांवर दगडफेक आणि आमची भूमिका.
आजचे आंदोलन हे रोहित वेमुला याच्या आत्महत्येचा निषेध करावा म्हणून आयोजित केले होते. छात्रभारती संघटना हि या स्टूडेंट्स फ्रंटची निमंत्रक होती. विद्यापीठ बंद यशस्वी केल्यानंतर कुलगुरूंना निवेदन देण्यासाठी आंदोलक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे गेले. त्याठिकाणी कुलगुरूंच्या वतीने विद्यापीठाचे कुलसचिव मा. एम. ए. खान यांनी निवेदन स्वीकारले. त्यानंतर सदर निदर्शने संपल्याचे जाहीर केले गेले. त्यानंतर काही स्टूडेंट्स फ्रंटमध्ये सामील नसलेल्या काही  संघटनांनी विद्यापीठातील महात्मा फुले भवन येथे आयोजित ‘सत्यनारायण पूजे’ला विरोध दर्शवण्यासाठी निदर्शने केली. तेथे त्यांच्यावर दगडफेक केली गेली. झालेली घटना निंदनीय अशीच आहे. परंतु  ‘मुंबई युनिवर्सिटी स्टूडेंट्स फ्रंट’चा यात काहीही संबंध नाही. विद्यापीठातील कुठल्याही धार्मिक कार्याला ‘मुंबई युनिवर्सिटी स्टूडेंट्स फ्रंटचा विरोध कायम असेल, परंतु हे आंदोलन त्या विषयी नसल्यामुळे झालेल्या घटनेचा ‘मुंबई युनिवर्सिटी स्टूडेंट्स फ्रंटचा संबंध नाही हे आम्ही जाहीर करतो.