खा.सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर उठविला संसदेत आवाज, तातडीने मदतीची मागणी.

Supriya Sule in parliament
Share this News:

पुणे, दि.१५- बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा.सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावर आवाज उठविला. लोकसभेतील सत्रात बोलतांना त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळी परिस्थिती यावर तातडीने उपाययोजना केंद्राने राबवून निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.

यावेळी बोलतांना खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या, सरकार कोणत्याही पक्षाचे असो शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दुर्दैवी आहेत. एका शेतकऱ्याची आत्महत्याही देशासाठी अतिशय शरमेची बाब आहे. राज्यात यंदा पावसाचे प्रमाण अतिशय

कमी असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः मराठवाड्याच्या लातूर, बीड सारख्या भागात १५ दिवसातून एकदा पाणी येते इतकी गंभीर परिस्थिती आहे. तसेच विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रसह संपूर्ण महाराष्ट्राला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. रब्बी आणि खरीप पिके धोक्यात आली आहे याचा परिणाम अन्नधान्य उत्पादनावर देखील होणार आहे. अन्नटंचाईचे संकट समोर उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत राज्याला

केंद्राकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे.

केंद्राचे पथक दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना पळवून लावले ही विचार करण्यासारखी आणि गंभीरपणे घेण्याची बाब आहे असेही त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्राने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा. महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीत होरपळत आहे.

पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी जलसंधारण कार्यक्रमांवर भर दिला गेला पाहिजे. त्यासाठी अधिकच निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली केंद्राने राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने पावले उचलून शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यावी अशी विनंती त्यांनी यावेळी लोकसभेत बोलतांना केली.