‘डोण्ट वरी बी हॅपी’ ही मानसिक ताण दूर करत आयुष्य जगण्याची गोष्ट – उमेश कामत
पुणे, दि. ८ ऑगस्ट : मानसिक ताण हा खरेतर आजार आहे, मात्र आपल्याकडे अजूनही तो आजार समजला जात नाही.‘डोण्ट वरी बी हॅपी’ या नाटकातून आजच्या पिढीतील पती-पत्नीच्या नातेसंबंधामध्ये असलेला ताण कमी करत जगण्याची एक नवीउमेद देण्याचा प्रयत्न केला असल्याचे, मत या नाटकातील प्रमुख कलाकार उमेश कामत यांनी व्यक्त केले.
सोनल प्रोडक्शन निर्मित व अद्वैत दादरकर दिग्दर्शित ‘डोण्ट वरी बी हॅपी’ या नाटकाचा १०० वा प्रयोग येत्या रविवार दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण येथे होत आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत कामत बोलत होते. या नाटकात प्रणोतीची प्रमुख भूमिका साकारलेली अभिनेत्री स्पृहा जोशी, निर्माते सोनल व नंदू कदम, लेखक मिहीर राजदा आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उमेश कामत म्हणाले, “आज तरुण पिढीची जीवनशैली बदलते आहे. ताण-तणाव हे त्यांच्यासाठी रोजचेच झाले आहेत. मात्र या बिझी आयुष्यात केवळ पैसा मिळविण्यासाठी न पळता आयुष्यातला आनंद उपभोगण्यासाठीही वेळ देणे गरजेचे आहे.”
चित्रपट, मालिका आणि नाटक या तीनहीमध्ये काम करण्याची माझी इच्छा या नाटकामुळे पूर्ण होत असून नाटकातून आजच्या पिढीचे प्रतिबिंब आम्ही उभे करत असून या पिढीने ताणतणावावर मात करीत जगण्याची नवी उमेद शोधणे आज गरजेचे आहे असेही कामत यावेळी म्हणाले.
आजच्या काळातील समस्यांबरोबरच पती- पत्नी यांमधील नातं उलगडणारं असं हे नाटक असून कामामुळे येणारे मानसिक ताण, एकटेपण, एकाकीपणा यांवरही नाटकात परखडपणे भाष्य करण्यात आले आहे. व्यावसायिक रंगभूमीवर अशा प्रकारे थेट आणि टोकदार भाष्य करूनही नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे यावरून या विषयाची गरज अधोरेखित होत असल्याचे मत यावेळी या नाटकात प्रणोतीची मुख्य व्यक्तीरेखी साकारणा-या स्पृहा जोशी यांनी व्यक्त केले.
नाटकाचे लेखक मिहीर राजदा यावेळी म्हणाले, “एखाद्याला मानसिक ताण आला आहे ही गोष्टचं आपल्याकडे हसण्यावारी घेतली जाते. मात्र या ताणामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो यावरच या नाटकामध्ये परखडपणे भाष्य केले आहे.”
‘डोण्ट वरी बी हॅपी’ हे नाटक व्यावसायिक दृष्ट्या तर यशस्वी ठरत आहेच, याबरोबरच नाटकाने अनेक पुरस्कारही पटकाविले आहेत हे विशेष. अद्वैत दादरकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून अमोल फडके यांची प्रकाशयोजना, साई-पियुष यांचे संगीत, चैत्राली यांची वेशभूषा यामुळे नाटक एका वेगळ्या उंचीवर पोहोचले आहे.
येत्या शनिवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह येथे रात्री ९.३० वाजता नाटकाचा ९९ वा प्रयोग होणार असून रविवार दि. १४ ऑगस्ट रोजी नाटकाचा १०० वा यशस्वी प्रयोग सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे होणार आहे.