चाकणजवळ पेट्रोल पंपात 6 लाखांची वीजचोरी उघड
पुणे, दि. 09 : चाकणजवळील कुरळी गावात पेट्रोल विक्री पंपामध्ये वीजमीटर यंत्रणेत फेरफार करून सुरु असलेली 5,68,840 रुपयांची वीजचोरी उघडकीस आली. या प्रकरणी एकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला.
याबाबत माहिती अशी, की राजगुरुनगर विभाग अंतर्गत चाकण जवळील कुरुळी येथील पेट्रोल विक्री पंपातील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्यामुळे महावितरणकडून वीजमीटर यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यामध्ये सीटी (करंट ट्रान्सफॉर्मर) परस्पर बसवून घेतल्याचे व वायरिंगमध्ये फेरफार करून वीजवापराची मीटरमध्ये नोंद कमी होईल, अशी सोय केल्याचे आढळून आले. यात एकूण 32,400 युनिटची म्हणजे 5 लाख 68 हजार 840 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
वीजचोरीप्रकरणी पेट्रोल विक्री पंपाचे वीजग्राहक व वापरकर्ता हनुमंत अनंतराव कड विरुद्ध सोमवारी (दि. 5) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.