दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक फी माफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन.

Share this News:

मुंबई- दि.30 : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्याच्या संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफीसाठी १३ मोर्चे काढण्यात आले होते,यामध्ये ५० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होते. तसेच  अधिवेशन काळात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे ,गटनेते जयंत पाटील, अमरसिंह पंडित, संग्राम जगताप यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. तरी देखील या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासन लक्ष देत नसल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करीत सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली.

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्याची आवश्यकता असताना सरकारने फक्त परिक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त विद्यार्थी सरकारी मदतीपासून वंचित राहत आहेत.त्यामुळे सरकारने फक्त परिक्षा शुल्क माफ न करता विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले व सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी बोलताना आ.राणा जगजितसिंह पाटील म्हणाले भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी संकटात आला आहे.  शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आर्थिक अडचणीमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे. अशा काळात या  विद्यार्थ्यांना माय-बाप सरकारने मदत करण्याची अपेक्षा होती. आम्ही देखील सातत्याने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ करावे अशी मागणी केली होती, परंतु या सरकारने  केवळ परिक्षा शुल्क माफ केले आहे.

आमची सरकारकडे मागणी आहे की ५०टक्के पेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या भागातील विद्यार्थ्यांची संपूर्ण शुल्क माफी करावी,तसेच मुंबई, पुणे सारख्या शहरी भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी व निवासासाठी त्यांना निर्वाह भत्ता देण्यात यावा यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, जर सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी पाटील यांनी दिला.