राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘समता सप्ताह’ साजरा करणार – आ.निरंजन डावखरे

Share this News:

महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘समता सप्ताह’  साजरा करणार – आ.निरंजन डावखरे

मुंबई – दि.30 : येत्या ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतीराव फुले यांची तर १४ एप्रिल रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘समता सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात ‘ समता सप्ताहाची’ रूपरेषा व त्यामागील संकल्पना मांडण्या करिता बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना ” समता सप्ताहात ” थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजामध्ये पोहोचविण्याकरिता परिसंवाद, चर्चासत्र व पथनाट्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. या बैठकीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निलेश राऊत, रविकांत वर्पे, आदिल फरास आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते