तब्बल ३ हजार किमीची पायी नर्मदा परिक्रमा करीत सौर उर्जा जनजागृती

सदाशिव पेठेतील नर्मदा प्रेमी मंडळ : पुण्यातील उदय जोशी ठरले पायी परिक्रमा पूर्ण करणारे पहिले मा.नगरसेवक,भाजपा,पुणे
पुणे : देशातील विविध भागांमधून भक्ती-भावाने लोक नर्मदा परिक्रमा करण्यास जातात. पुण्यातून देखील सदाशिव पेठेतील नर्मदा प्रेमी मंडळातील तब्बल २३ ज्येष्ठ नागरिकांनी आॅक्टोबर २०१५ मध्ये नर्मदा परिक्रमेकरीता प्रस्थान केले होते. त्यातील ४ ज्येष्ठ नागरिकांनी सुमारे ३ हजार किमीची पायी परिक्रमा पूर्ण केली आहे. परिक्रमेदरम्यान नर्मदा काठी वसलेल्या आदिवासी पट्ट्यातील नागरिकांना सौर उर्जेचा वापर कसा केला जातो, याची माहिती देत उपयुक्त साधने देखील देण्यात आली. विशेष म्हणजे, या उपक्रमाचे आयोजक भा.ज.पा.चे माजी नगरसेवक उदय जोशी हे पायी परिक्रमा पूर्ण करणारे पहिलेच नगरसेवक ठरले आहेत.
सदाशिव पेठेतील नर्मदा प्रेमी मंडळातर्फे पायी नर्मदा परिक्रमा करणाºया मा.नगरसेवक उदय जोशी, किरण वाईकर, नंदू वाईकर आणि पी.एल. वाईकर यांचे पुण्यात आगमन होताच नर्मदे हर… च्या निनादात पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, किशोर शशितल, सुनील केसरी, माजी नगरसेविका शुभदा जोशी, मयुरेश जोशी, अनुप जोशी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नागनाथ पार येथून काढलेल्या मिरवणुकीत प्रभात बँड, अश्वमेध बँड, चौघडा सहभागी झाले. फटाक्यांच्या अतिषबाजीमध्ये आणि रांगोळी व फुलांच्या पायघडया घालून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. परिक्रमेकरीता गेलेले ज्येष्ठ नागरिक ५० ते ८० वयोगटातील होते.
उदय जोशी म्हणाले, नर्मदा परिक्रमा अतिशय आव्हानात्मक होती. संपूर्ण परिक्रमा ही तब्बल ३००० किलोमीटर एवढी असून या परिक्रमेदरम्यान शूलपाणी जंगलाचा विस्तीर्ण भाग, लक्कडकोट झाडी आणि ९ अवघड डोंगराचा सामना करीत परीक्रमा पूर्ण करावी लागली. मध्यप्रदेश आणि गुजरात भागातील नागरिकांकडून माणुसकीचे दर्शन घडले. स्वत:च्या घरात परिक्रमावासियांकरीता भोजन देणे शक्य नसेल, तर शेजारच्यांकडून उसने आणून परिक्रमावासियाला घासातला घास देणारी माणसे या भागात भेटली. केवळ या नागरिकांच्या माणुसकीमुळे परिक्रमा ख-या अर्थाने पूर्ण होऊ शकते.
ते पुढे म्हणाले, परिक्रमा मार्गातील नगरपालिका, ग्रामपंचायतींअंतर्गत असलेल्या परिसरात शौचालये अभावाने दिसतात. अमरकंटक हे उगमस्थान असून अनेक धर्मशाळा आहेत. परंतु भाविक आणि परिक्रमावासियांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे प्रात:विधीकरीता बाहेर जावे लागते. परिक्रमावासियांच्या सोयीकरीता सुलभ स्वच्छतागृहे होतील, याकडे लक्ष देऊन सरकारी पातळीवर प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
किरण वाईकर म्हणाले, ओंकारेश्वर ते अमरकंटक अतिशय खडतर असा मार्ग ७३ दिवसात आणि अमरकंटक ते ओंकारेश्वर असा २१ दिवसात पूर्ण करुन ९४ दिवसात ही परिक्रमा आम्ही पूर्ण केली. जगामध्ये पवित्र अशी नदी नर्मदा माता आहे, परंतु १२ टक्के नदी दूषित होत आहे. हे प्रदूषण थांबविण्याकरीता प्रयत्न व्हायला हवे. सरस्वती नदीत तीन दिवस स्थान केले आणि गंगा नदीत एक दिवस स्नान केले तर माणूस पवित्र. परंतु नर्मदा मातेच्या केवळ दर्शनाने माणूस पवित्र होतो. त्यामुळे ही परिक्रमा अत्यंत महत्त्वाची असून नदीचे प्रदूषण थांबविण्याकरीता प्रत्येकाने पुढे यायला हवे