आयटीआयमध्ये सुमारे 50 हजार प्रवेश क्षमता वाढविणार – डॉ. रणजित पाटील

Share this News:

मुंबई, दि. 20 : राज्यातील तरुणांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याकरिता आयटीआयमध्ये सुमारे 50 हजार प्रवेश क्षमता वाढविणार असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.

आयटीआयमध्ये 50 हजार प्रवेश क्षमता वाढविण्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी मांडली होती त्यांला उत्तर देताना डॉ.पाटील बोलत होते.

डॉ.पाटील म्हणाले, राज्यातील तरुणांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याकरिता शासनाने राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात 417 शासकीय व 425 खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. ह्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून इयत्ता 10 वी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 1 ते 2 वर्ष कालावधीचे अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी अशा 79 प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांध्ये प्रशिक्षण देण्यात येते. सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रत्येक वर्षी सरासरी 1 लाख 40 हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत असतात.

राज्यात तंत्रनिकेतन (पॉलिटेक्नीक) मध्येही आयटीआयचे कोर्स सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यभरात आयटीआयच्या प्रवेशासाठी जिथे मागणी असेल तिथे कोर्स सुरु केले जातील. तसेच प्रवेश क्षमता व तुकड्यांची संख्याही वाढविली जाईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. आयटीआयतील अद्ययावत यंत्रसामुग्रीची आवश्यकता भासेल तिथे ते देण्यात येईल. कल्याण येथील आयटीआय या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येईल.

या चर्चेत सदस्य सर्वश्री दत्तात्रय सावंत, सुधीर तांबे, नागोराव गाणार, रामहरी रुपनवर, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आदींनी सहभाग घेतला.