राज्याच्या आदिवासी विभागात सावळागोंधळ – धनंजय मुंडे

just pune things app
Share this News:

मुंबई – दि.17 : राज्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या स्वेटर वाटपामध्ये दिरंगाई केल्याबद्दल विधानपरिषदमध्ये विरोधकांनी आज आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांना धारेवर धरले. विधानपरिषदेमध्ये तारांकित प्रश्नाच्या चर्चेवेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आदिवासी विभागात सावळागोंधळ सुरु असल्याचा आरोप केला. आदिवासी विकास खात्यात आदिवासी मंत्री असूनही आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, अशी टीकाही मुंडे यांनी केली.

    १६ ऑक्टोबर २०१६ रोजी ई-निविदेद्वारे वुलन स्वेटर खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र या निविदेबाबत काही कंत्राटदरांच्या तक्रारी आल्यामुळे निविदा थांबवली. त्यानंतर हिवाळा संपल्यामुळे खरेदी प्रक्रियाच रद्द करण्यात आल्याची कबुली आदिवासी विकास मंत्र्यांनी आपल्या उत्तरात दिली. तसेच हे सांगतानाच सन २०१५-१६ वर्षात रेनकोट खरेदी प्रक्रियेलाही अशाच प्रकारे उशीर झाल्यामुळे, संपूर्ण टेंडरच रद्द करण्यात आले होते व परिणामी खात्याने रेनकोट सुद्धा वाटले नसल्याचा धक्कादायक खुलासा सावरा यांनी सभागृहात केला. यावेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

   स्वेटरअभावी नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थी कुडकुडत असल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवर दाखवली गेली, तेव्हा आदिवासी विकास मंत्री नाशिकमध्ये थंडी नसल्याचे सांगत होते, हे खेदजनक असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. तसेच आधी वह्या व इतर शैक्षणिक साहित्य आणि नंतर रेनकोट व स्वेटर यांच्या वाटपामध्ये सातत्याने दिरंगाई होत आहे, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आदिवासी विभागातीलच टेंडर नेहमी कशी काय रद्द होतात? रद्दच करायचे असेल तर आदीवासी विभाग टेंडर काढतेच कशाला? असे प्रश्नही तटकरे यांनी यानिमित्ताने उपस्थत केले. यावर संपूर्ण प्रक्रियेची पुन्हा तपासणी करुन संबंधितांवर कारवाई करू, असे उत्तर विष्णु सावरा यांनी दिले.