बैल गेला अन् झोपा केला, राज्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारची भूमिका – नवाब मलिक.

Share this News:

मुंबई – दि.12 : गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील जनता राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत होती.परंतु सरकार मात्र राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचे सांगत राहिले. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर काल राज्य सरकारने 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या गावामध्ये सरकारने आधी दुष्काळसदृश्य केली होती. सरकारने राज्यातील दुष्काळी परिस्थिती योग्य हाताळली नसून राज्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारने बैल गेला अन् झोपा केला अशी भूमिका घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात दुष्काळामुळे जवळपास 50 लाख शेतकरी,शेतमजूर लोक विस्थापित झाले, लोकांना रोजगार देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजनेत मशीनचाच अधिक वापर झालेला आहे , राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत सरकारवर कुठेतरी कोर्टाचे ताशेरे ओढले जाऊ नये या भितीपोटीच राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मागील आठवड्यात पंतप्रधानासमवेत झालेली बैठक ही कोर्टाच्याच भितीने घेण्यात आलेली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री आम्ही केंद्राकडे दहा हजार कोटी रुपयांची मदत मागितली असून पंतप्रधानानी आम्हाला त्यासाठी 6 आठवड्याची मुदत दिल्याची सांगत आहेत. सहा आठवड्य़ात राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे सहा आठवड्यात ते मदतीसाठी प्रस्ताव दाखल करणार मग राज्याला मदत जाहीर केंव्हा होणार आणि पैसा केंव्हा मिळणार ?

एकंदरीतच दुष्काळ जाहीर करणे,पंतप्रधानांसमवेत बैठक घेणे,मदतीची मागणी करणे हे पाऊस केंव्हा पडतोय याचा अंदाज घेऊनच काम सुरु आहे. केवळ कागदी घोडे नाचविणे हेच सरकारचे काम राहिले आहे. कोर्टात सरकारच्या विरोधात एखादा आदेश पारित होऊ नये या भितीपोटीच राज्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला असून एकंदरीतच सरकारने दुष्काळ जाहीर करण्याबाबत बैल गेला अन् झोपा केला अशी भूमिका घेतली असल्याची  टीका नवाब मलिक यांनी केली आहे.