पुणे परिमंडलामध्ये जूनच्या वीजबिलाबाबत तक्रारकर्त्या 98 टक्के ग्राहकांचे शंका निरसन

Share this News:

पुणे, दि. 04 जुलै 2020: लॉकडाऊनच्या कालावधीमधील वीजवापराचे जून महिन्यात मीटर रिडींगप्रमाणे महावितरणकडून बिल देण्यात आले आहे. मात्र या बिलाबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये सुरु असलेल्या तक्रार निवारण कक्षांमध्ये गेल्या आठवड्याभरात सुमारे 40 हजार 800 पैकी सुमारे 40 हजार (98 टक्के) वीजग्राहकांच्या तक्रारींचे व शंकांचे जागेवरच निरसन करण्यात करण्यात आले आहे.

 

जून महिन्यामध्ये मागील एप्रिल व मे या दोन महिन्यांसह मीटर रिडींगनुसार वीजबिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंका निरसन व तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, वेल्हे व मुळशी तालुक्यांमध्ये महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आला आहे.

 

गेल्या आठवड्याभरात पुणे शहरात सुमारे 20 हजार 500, पिंपरी चिंचवड शहरात 11 हजार 200 आणि हवेली ग्रामीण, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, वेल्हे व मुळशी तालुक्यांमध्ये 9100 ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयांमध्ये जूनच्या वीजबिलासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले होते. त्यापैकी सुमारे 40 हजार तक्रारकर्त्यांचे जागेवरच शंका निरसन करण्यात आले. उर्वरित सुमारे 800 ग्राहकांच्या वीजबिलांवर मीटर सदोष असणे, घर बंद असल्याने किंवा अन्य कारणांमुळे रिडींग घेता न येणे किंवा घेतले नसणे आदी कारणे दिसून आलेली आहेत. या तक्रारींच्या निवारणाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

 

पुणे परिमंडलात आतापर्यंत 179 सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तसेच शाखा, उपविभाग, विभाग कार्यालयस्तरावर 749 वेबिनारचे आयोजन करून जूनच्या वीजबिलासंदर्भात सविस्तर माहिती देऊन नागरिकांचे शंका समाधान करण्यात आले आहे. तसेच https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकद्वारे देखील घरगुती ग्राहक वीजबिल तपासून किंवा पडताळून पाहत आहेत. यासोबतच लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन त्यांना जूनच्या वीजबिलाबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे.

 

जूनच्या वीजबिलात लॉकडाऊनच्या कालावधीमधील (सुमारे 90 ते 97 दिवस) प्रत्यक्ष वीजवापरानुसार युनिट संख्या व बिलाची रक्कम नोंदविण्यात आली आहे. रिडींग प्रमाणे असलेल्या या एकूण युनिट संख्येला तीन महिन्यांत विभागून योग्य स्लॅब व दरानुसार वीजबिलाची आकारणी करण्यात येत आहे. त्यामध्ये एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड लादलेला नाही अशी ग्वाही देत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.