वीजग्राहक दिनाच्या संवाद कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद

Share this News:

बारामतीदि. 24 जुलै 2019 : वीजविषयक तक्रारींचे जलदगतीने निवारण व ग्राहकसेवेची माहिती देण्यासाठी मंगळवारी (23) विभाग कार्यालयांमध्ये आयोजित ग्राहकदिनाच्या संवाद कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. वीजग्राहकांसह विविध ग्राहक संस्थांनी देखील महावितरणच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

बारामती परिमंडलमध्ये एकूण 13 विभाग कार्यालयांमध्ये आयोजित या उपक्रमात वैयक्तिक व सार्वजनिक स्वरुपाच्या एकूण 265 तक्रारी प्राप्त झाल्या. यातील 188 तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यात आले तर 77 तक्रारींच्या निवारणासाठी संबंधीत उपविभाग कार्यालयांकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. महावितरण व वीजग्राहक यांच्यातील संवाद कायम राहावा तसेच सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण व्हावे, यासाठी बारामती परिमंडल अंतर्गत सर्व संवसु विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येक महिन्याच्या चौथ्या मंगळवारी वीजग्राहक दिनाचे आयोजन करण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांनी दिले आहेत. तसेच या उपक्रमात सहभागी सर्व वीजग्राहकांचे आभार मानले आहे.

बारामती मंडलमध्ये बारामती, केडगाव व सासवड या विभाग कार्यालयांमध्ये आयोजित ग्राहकदिनात वैयक्तिक व सार्वजनिक स्वरुपाच्या 91 तक्रारी दाखल झाल्या.यावेळी संबंधीत विभागांचे कार्यकारी अभियंता यांनी थेट वीजग्राहकांशी संवाद साधून तक्रारी दाखल करून घेत त्यापैकी 69 तक्रारींचे जागेवरच निराकरण केले. तर उर्वरित 22तक्रारींवर कार्यालयीन कार्यवाही किंवा स्थळतपासणी आवश्यक असल्याने त्या विहीत मुदतीत सोडवून संबंधीतांना त्याबाबत कळविण्यात येणार आहे. अधीक्षक अभियंता श्री.चंद्रशेखर पाटील यांनी केडगाव येथे वीजग्राहक दिनात सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या वीजविषयक अडचणी, समस्या जाणून घेत विविध योजना व ग्राहकसेवांची माहिती अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांनी दिली. यासोबतच ग्राहकदिनात कार्यकारी अभियंता सर्वश्री अरविंद वनमोरे (सासवड), श्री. राजेंद्र येडके (केडगाव),अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. देवदास कोरडे (बारामती) यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.