पुणे-नाशिक महामार्गावरील भूसंपादनाची कामे गतीने पुर्ण करा-जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Support Our Journalism Contribute Now

पुणे, दि.03: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक कोंडी लवकरात लवकर सोडविण्यासाठी या मार्गावरील भूसंपादनाची कामे गतीने पुर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.

 

पुणे-नाशिक महामार्गावर सुरु असलेल्या भूसंपादनाची कामे मार्गी लावण्याबाबत जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, भुसंपादन समन्वय अधिकारी सारंग कोडलकर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी  राम म्हणाले, पुणे-नाशिक महामार्गावरील भूसंपादनाचे गट सुटलेल्या जमिन मालकांचे प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाने भुसंपादन अधिका-यांकडे लवकर सादर करावेत. तसेच भुसंपादन अधिका-यांनी जमिनीचे भुसंपादन करुन जमीन मालकांना जमिनीचा मोबदला तात्काळ द्यावा. या मार्गावरुन जाणा-या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कामे गतीने पूर्ण करावीत, असेही ते म्हणाले.

 

भूसंपादनाविषयीच्या जमिन मालकांच्या समस्या सोडवण्यासाठी दर मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन समन्वय शाखेत संपर्क केंद्र सुरु करावे, अशा सूचना राम यांनी यावेळी दिल्या.

 

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, पुणे-नाशिक महामार्गावरील खेड, चाकण, नारायणगाव या ठिकाणची वाहतूक कोंडी टाळणे गरजेचे आहे. या मार्गावरील भूसंपादनाची कामे लवकर झाल्यास रस्त्याचे रुंदीकरण होवून वाहतूक कोंडी कमी होईल. या मार्गावरुन जाणा-या नागरिकांची समस्या लक्षात घेवून भूसंपादन अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांनी गतीने कामे करावीत, अशा सूचना खासदार डॉ. कोल्हे यांनी यावेळी दिल्या.

बैठकीला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व संबधित भूसंपादन अधिकारी तसेच जमिन मालक उपस्थित होते.

Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.