अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा

Share this News:

7 /10/2019- भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीचे कोथरूड विधानसभा मतदार संघातील उमेदवार माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

 

महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. या प्रसंगी महासंघाचे
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मंजुनाथ कुलकर्णी, युवा आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मीकांत धडफळे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय शेकदार उपस्थित होते. महासंघातर्फे कोथरूड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरलेल्या राहुल जोशी आणि मयुरेश अरगडे यांनी आपले अर्ज मागे घेतल्याची अधिकृत घोषणाही यावेळी केली.

 

 

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तर्फे तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. ब्राह्मणांच्या आर्थिक विकासाकरिता आणि ब्राह्मण समाजाला उद्योग-व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्यासाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करणे, पौरोहित्य करणाऱ्या व्यक्तींना दरमहा 5000 रुपये मानधन सुरू करणे आणि ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे ब्राह्मण समाजाला संरक्षण देणे या मागण्यांचा त्यामध्ये समावेश होता.

 

चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्य स्तरावरील प्रमुख नेता या भूमिकेतून या सर्व मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासक पावले उचलण्यात येतील असे स्पष्ट केले. तसेच ब्राह्मण समाजाच्या हितासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरीने प्रयत्न करण्यात येतील आणि त्यासाठी आपण आग्रही भूमिका घेऊ असे देखील स्पष्ट केले. त्यामुळेच चंद्रकांत दादा पाटील यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात येत असल्याचा निर्णय अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतला अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
ब्राह्मण महासंघ आणि ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांचा हवेत चंद्रकांत दादा पाटील यांनी आज दिवसभर विविध बैठका घेतल्या. त्यामध्ये ॲड. सचिन पटवर्धन यांनी यशस्वी तोडगा काढण्याबाबत मोलाची भूमिका बजावली अशी माहितीही कुलकर्णी यांनी दिली.