रेल्वे स्टेशन, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या हायवेवर प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जाणार -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Share this News:
  • पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांना विलीगीकरण कक्षात ठेवले जाणार

  • जिल्हयातील सेतू व महा ई-सेवा केंद्र व मालमत्तेची नोंदणी प्रकिया पुढील आदेशापर्यंत बंद

पुणे,दि.19- रेल्वे स्टेशन, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत, सार्वजनिक ठिकाणचा संपर्क टाळा, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर आदी उपस्थित होते.
दूध, धान्य, भाजीपाला, किराणा व औषधी अशा जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत सुरळीत ठेवण्याबाबतच्या सूचना पणनच्या अधिका-यांसह संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे सांगून विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, एन-95 मास्क आणि सर्जिकल मास्क उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. दोन हजार एन-95 मास्क आज प्राप्त होतील. सद्यस्थितीत आवश्यक असलेल्या व भविष्यातील आवश्यकता विचारात घेता अतिरिक्त औषधांचा साठा करण्याबरोबरच औषधींची कमतरता भासणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे व त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. शिक्षण संचालकांशी चर्चा करुन प्रवाशांच्या कॉरंटाइन व्यवस्थेसाठी अतिरिक्त वसतिगृह उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकूण 26 शिक्षण संस्था प्रमुखांशी चर्चा करुन पाच हजारांवर व्यक्तींची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहेत.
अधिक माहिती देताना ते म्हणाले , पुणे, पिंपरी -चिंचवड या ठिकाणी मिळून एकूण 19 करोनाग्रस्त आहेत. शहरातील 1 लाख 74 हजार 235 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील गर्दी टाळण्यासाठी बसेसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या असून यासंदर्भातील परिस्थिती लक्षात घेत निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुणे जिल्हयातील सेतू व महा ई-सेवा केंद्र व मालमत्तेची नोंदणी प्रकिया पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्हयातील सर्व वैद्यकीय अधिष्ठाता यांच्यासमवेत चर्चा केली असून खाजगी रुग्णालय व शासकीय रुग्णालयांच्या कार्यपदधतीत समन्वय व सुसूत्रता ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे यासंदर्भातील समन्वयाची जबाबदारी देण्यात आल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुण्यात येणाऱ्या प्रवाशी संख्या लक्षात घेता क्वारंटाईन सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवायची आहेत. प्रशासकीय पातळीवर 10 हजारापर्यंत बेड तयार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गर्दी टाळण्यासाठी समाजहित लक्षात घेता येणाऱ्या काही दिवसात याबाबतीत कठोर निर्णय घेण्यात येतील. पुण्यात आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढच्या दोन दिवसात हे पूर्णपणे अंमलात आणले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली आहे.
कोरोना आजारावर मात करण्यासाठी प्रशासन सक्षम आहे, यासाठी आपण प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.