कलाकार विरुध्द सैन्यदल संघ यांच्यात रंगणार फुटबॉल सामना

Share this News:

मुंबई, दि. 24 : कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर हिंदी व मराठी सिनेमा/दूरदर्शन क्षेत्रातील कलाकार विरुध्द सैन्यदल संघ यांच्यात फुटबॉल सामना रंगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत  फुटबॉल सामना रंगणार आहे.

 

फुटबॉल सामना 26 जुलै रोजी कूपरेज मैदान, महर्षी कर्वे रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक क्षेत्र, नरिमन पॉईंट, मुंबई येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. माजी सैनिक/विधवा तसेच कुटुंबियांना हा सामना पाहण्यासाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपगनर व ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिक/ विधवा तसेच कुटुंबियांनी  फुटबॉल सामना पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

कारगिल विजयदिनी राज्यातील सर्व सिनेमागृहात ‘ऊरी’ सिनेमा मोफत दाखविणार – संभाजी पाटील-निलंगेकर

मुंबई दि. 24 : देशभरात २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृध्दींगत व्हावा याकरीता राज्यातील सर्व सिनेमागृहात ‘ऊरी – द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा मोफत दाखविण्यात येणार असल्याची माहिती माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.

माजी सैनिक कल्याण विभागामार्फत सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आलेल्या बैठकीत सिनेमाचे वितरक, सिनेमागृहांचे मालक, चित्रपट संघटना यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली. या बैठकीस विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह तसेच संबधित अधिकारी उपस्थित होते.

श्री.निलंगेकर यांनी सांगितले की, या सिनेमाचे खास प्रक्षेपण करण्यामागे मुख्य उद्देश हा  युवकांमध्ये राष्ट्रकर्तव्याची भावना निर्माण करणे असा आहे. कारगिल विजय दिनाचे महत्व पाहता हा सिनेमा मोफत दाखविण्याचे शासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. येत्या २६ जुलै, २०१९ रोजी सकाळी १० वाजता या सिनेमाचे प्रक्षेपण संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात होत असून चित्रपट वितरक, सिनेमागृह मालक, चित्रपट संघटना यांनी देशाप्रती असलेले कार्य मानून यास सहमती दिलेली आहे. त्यामुळे या कारगिल विजय दिनी खऱ्या अर्थाने भारतमातेच्या सर्व सुपूत्रांचा उर अभिमानाने भरुन येईल.

प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सिनेमाचे मोफत प्रक्षेपणाबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. सिनेमागृहात मोफत सिनेमा प्रक्षेपणाबाबतचे यशस्वी आयोजन करण्याकरीता पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्हयातील सर्व चित्रपटगृह चालक व महाविद्यालयाचे प्राचार्य यांची बैठक आयोजित करावी अशा सूचना श्री.निलंगेकर यांनी बैठकीत दिल्या. सदर कार्यक्रमाचे परिपत्रक शासनाव्दारे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात येणार आहे.