सत्रीय नृत्यातून उलगडला आसामच्या पारंपरिक कलेचा अनमोल ठेवा
पुणे : पुराणातील विविध कथांचे सत्रीय नृत्य व नाट्य स्वरुपातील सादरीकरणातून एका वेगळ्या नृत्यशैलीची व संगीताची अनुभूती रसिकांनी घेतली. सत्रीय नृत्यातील वेगळेपण, वेशभूषेतील विविधता आणि या सगळ्याला साजेशी अशी आसामी संगीताची जोड या सगळ्या गोष्टींच्या एकत्रित संगमातून साकारलेल्या एका अनोख्या कलाकृतीने रसिक मंत्रमुग्ध झाले. मनोहारी नृत्यरचनांमधून आसामच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन रसिकांना घडले. सत्रीय नृत्यातून आसामच्या पारंपरिक नृत्य-नाट्य कलेचा अनमोल ठेवा रसिकांसमोर उलगडला.
डिपार्टमेंट आॅफ कल्चरल अफेअर्स, गव्हर्नमेंट आॅफ आसाम आणि आसोमी, पुणे यांच्या वतीने स्रिजनिर नृत्य अर्घ्य या स्रिजनी भस्व महंता यांच्या सत्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सेनापती बापट रस्त्याजवळील भारतीय विद्या भवन येथे करण्यात आले होते. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यकंटेशम, ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चापेकर, भारती विद्यापीठ परफॉर्मिंग आर्टचे शारंगधर साठे, कमिशनर आॅफ हायर एज्युकेशन विशाल सोलंकी, सिम्बायोसिस एल्टिस अॅण्ड सिम्बायोसिस इन्स्टिट्युट आॅफ फॉरेन अॅण्ड इंडियन लॅग्वेजेस चे डायरेक्टर शिरीष सहस्रबुध्दे, त्रिबेणी गोस्वामी – माथुर, आसोमी, पुणेचे सेक्रेटरी राजीब बोर्कोटोकी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात व्हायोलिन, बासरी, खोल, सिम्बल्स अशा वाद्यांच्या अनोख्या आसामी शैलीतील वादनाला रसिकांनी मनापासून दाद दिली. यानंतर श्रीकृष्ण द्वारकेला जाताना गोपिका श्रीकृष्णाला त्यांनी एकत्र व्यतीत केलेल्या काळाची आठवण करून देतात अशा अर्थाच्या हरी हे बुजोलोहू, तुहू बोरो निर्दोआ… या गीताद्वारे नृत्यातून स्रिजनी भस्व महंता यांनी कृष्ण आणि गोपिकांची कथा रसिकांसमोर अप्रतीमरित्या उलगडली.
प्रेम, करुणा, क्रोध, शौर्य अशा विविध भावनांचा समावेश असलेल्या तसेच भक्त प्रल्हाद आणि नरसिंह अवताराची कथा सांगणा-या न्रिक्सिंघो लीला या संस्कृत नाटकावर आधारित्य नृत्य-नाट्य सादरीकरणाने रसिक थक्क झाले. यामधील वेशभुषा व विविध साधने यामुळे हे नाट्य अधिकच खुलत गेले. साक्षात नरसिंह समोर असल्याची अनुभूती घेत पुणेकर नरसिंह अवतार बघून अवाक् झाले. पुण्यातील सत्रीय नृत्यांगना डॉ. देविका बोरठाकूर आणि सत्रीय नृत्याचे शिक्षण घेणा-या नयनमोनी भगवती, तन्वीर लांबा, साक्षी गायकवाड, योशा रॉय या पुण्याच्या टीमने भगवान श्रीकृष्ण व प्रभु श्रीरामांवर आधारित नृत्य रचनेने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
हरी सायकिया, देबजित सायकिया (खोल), बर्नाली शर्मा, नित्या नंदा डेका (गायन), द्विपेंद्र शर्मा (व्हायोलिन), प्रसन्न बरुआह (बासरी), परमनंदा काकोती (सिम्बल्स) यांनी साथसंगत केली. दीपंकर दत्ता, मोंजिल कलिता, मोंटू हजारिका, देबजित दत्ता यांनी देखील सादरीकरण केले.
*फोटो ओळ : डिपार्टमेंट आॅफ कल्चरल अफेअर्स, गव्हर्नमेंट आॅफ आसाम आणि आसोमी, पुणे यांच्या वतीने स्रिजनिर नृत्य अर्घ्य या स्रिजनी भस्व महंता यांच्या सत्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सेनापती बापट रस्त्याजवळील भारतीय विद्या भवन येथे करण्यात आले होते. यावेळी सादरीकरण करताना स्रिजनी भस्व महंता आणि सहकलाकार.