सायक्लॉथॉनमधून पुणेकरांनी दिला ‘इंधन वाचवा’ चा संदेश

Share this News:
 
पुणे : सायकल चालवा… इंधन वाचवा, प्रदुषण मुक्त भारत… हाच आमचा युवा भारत, अशा घोषणा देत सायकलवर स्वार होऊन २०० हून अधिक पुणेकरांनी इंधन वाचवा चा संदेश दिला. सायक्लॉथॉन आणि वॉकेथॉनच्या माध्यमातून लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटांतील सायकलप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी जॉय आॅफ लाईफ अंतर्गत आयोजित या आगळ्या वेगळ्या उपक्रमात मोठया उत्साहाने सहभाग घेतला.
महेश प्रोफेशनल फोरम (एमपीएफ), पुणे वेस्ट च्या वतीने जॉय आॅफ लाईफ अंतर्गत पाषाण परिसरात सायक्लॉथॉनचे आयोजन करण्यात आले. पाषाण येथील संत तुकाराम मंगल कार्यालय येथून सायक्लॉथॉनला सुरुवात झाली. यावेळी अभिनेत्री राधिका देशपांडे, एमपीएफ पुणे वेस्टचे अध्यक्ष सीए दिनेश मुंदडा, कुशल राठी, रजनी काबरा, वृंदा तोतला, एकल विद्यालय संस्थेचे अध्यक्ष वसंत राठी, महिला समिती अध्यक्षा अंजली तापडीया, मनोज बेहेडे तसेच लायन्स क्लब आॅफ पुणे चतु:शृंगीचे अध्यक्ष कल्याणसुंदर, प्रशांत बो-हाडे, सुशिला चांडक आदी उपस्थित होते.
राधिका देशपांडे म्हणाल्या, सायकलवीर हा क्रांतीकारी असतो, तो सर्वांचा नेता होऊ शकतो. सायकलींमुळे केवळ शरीर संपन्नता नाही, तर विचारांची ताकद देखील मिळते. आयुष्य देखील एक प्रकारची सायकल आहे. सायकल फेरी व जनजागृतीपर उपक्रमांची आज नितांत गरज आहे. आमच्यासारख्या कलाकारांनी नागरिकांमध्ये जाऊन पर्यावरणाविषयी जागृती करण्याकरीता प्रयत्न करायला हवे. इंधन संपले तर कार किंवा इतर वाहनांना मरण येईल, मात्र सायकलला कधीही मरण येणार नाही.
एकल विद्यालय पुणे विभाग आणि लायन्स क्लब आॅफ पुणे चतुश्रृंगीच्या सहकार्याने सायक्लॉथॉनचे आयोजन करण्यात आले. सायक्लॉथॉनचा एकूण ७ किलोमीटरचा मार्ग होता. पाषाणमधील संत तुकाराम मंगल कार्यालय, साई चौक, शांती निकेतन, बालाजी चौकमार्गे सुस पाषाण रोडवर सायकलप्रेमींनी सहभाग घेतला. यावेळी  ३ किलोमीटरचा वॉकेथॉन देखील झाला. सायक्लॉथॉनचे यंदा ४ थे वर्ष होते.