आयुर्वेद हे स्वस्थ व सुखी जीवनाचे शास्त्र : प्रा. तनुजा नेसरी  

Share this News:
पुणे 25/8/2019 : अन्न हे भावना पोहोचवण्याचे एक माध्यम आहे. सुखी, आनंदी व स्वस्थ बनायचे असल्यास आपली जीवनशैली चांगली असली पाहिजे. आयुर्वेदामध्ये स्वस्थ आणि आनंदी जीवनाचे मूळ आहारामध्ये आहे असे सांगितले आहे. समतोल आहार हा षडरसात्मक असला पाहिजे म्हणजेच सहा रसांनी युक्त असला पाहिजे. आपले स्वास्थ्य चांगले असेल तर आपण आनंदी आणि सुखी जीवन जगू शकतो. आयुर्वेदामध्ये आहाराविषयी, जीवनशैलीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या असून त्या आपण अंगिकारल्या पाहिजेत. आयुर्वेद हे स्वस्थ व सुखी जीवनाचे शास्त्र आहे, असे मत आॅल इंडिया इन्स्टिटयूट आॅफ आयुर्वेदा, नवी दिल्ली (भारत सरकार) च्या संचालिका प्रा.तनुजा नेसरी यांनी व्यक्त केले.
प्रवीण मसालेवाले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०१७-१८ या वषार्साठी उद्योग जननी कमल पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन हडपसर मधील मराठा चेंबर आॅफ कॉमर्स येथील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त राजकुमार चोरडिया, विशाल चोरडिया, आनंद चोरडिया, मधुबाला चोरडिया, हुकमीचंद चोरडिया उपस्थित होते.
सन २०१७ या वर्षाच्या उद्योग जननी कमल पुरस्काराने पुणे विभागातून हडपसर येथील टेक्नोमेकच्या संचालिका माधवी लाहिरी आणि उर्वरित महाराष्ट्र विभागातून नाशिक येथील आर्या टेक्नॉलॉजीच्या संचालिका सुजाता बच्छाव यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, रुपये २१०००, तुळशीचे रोप असे पुरस्काराचे स्वरुप होते. पुण्यातील धायरी येथील बालाजी महिला बचतगटाच्या मृणाल महाबळेश्वरकर यांना बचत गटाच्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, रुपये ५०००, तुळशीचे रोप असे पुरस्काराचे स्वरुप होते.
सन २०१८ या वर्षाच्या उद्योग जननी कमल पुरस्काराने पुणे विभागातून धनकवडी येथील श्री साई गारमेंटसच्या संचालिका हेमलता पाचपुते व उर्वरित महाराष्ट्र विभागातून वसमत जिल्हा हिंगोली येथील कृष्णा हर्बल व कॉस्मेटिकच्या संचालिका वनिता दंडे यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, रुपये २१०००, तुळशीचे रोप असे पुरस्काराचे स्वरुप होते.  तसेच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंबळी येथील सीमा जाधव यांना उत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी महिला या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, रुपये ५०००, तुळशीचे रोप असे पुरस्काराचे स्वरुप होते.
प्रा.तनुजा नेसरी म्हणाल्या, युनायटेड नेशन्सने सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अस जाहीर केले आहे. २०२२-२५ जगामध्ये काही गोष्टी अत्यावश्यक झाल्या पाहिजेत. तेव्हाच आपण विकास झाला असे म्हणू शकू. प्रत्येक व्यक्तीला जसा जन्माला येणा-या व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे, तसेच प्रत्येकाला फूड सिक्युरिटी असणे आवश्यक आहे. फूड सिक्युरिटी हा महत्वाचा घटक आहे. प्रत्येकाला उत्तम, पोषक, चांगल्या दर्जाचे अन्न मिळाले पाहिजे यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत.
विशाल चोरडिया म्हणाले, पुरस्काराचे यंदा १८ वे वर्ष असून पन्नासहून अधिक उद्योजिका, व्यावसायिक महिलांचा सन्मान या माध्यमातून करण्यात आला आहे. प्रवीण मसाले आजी-आजोबांच्या कष्टातून सुरु झाले आणि मोठे झाले. या माध्यमातून अनेक व्यावसायिक महिला व बचतगटाच्या महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले जाते.
पुरस्काराला उत्तर देताना माधवी लाहिरी म्हणाल्या, पुरस्कारामुळे खूप प्रोत्साहन मिळाले आहे. माझे वडिल माझी प्रेरणा आहेत. प्रोत्साहन मिळाले तर यशाचे शिखर नक्कीच गाठता येते. वनिता दंडे म्हणाल्या, मला नेहमीच स्वत: काहितरी करावे असे वाटत होते. शिवणकाम, पार्लर अशा सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर हर्बल उत्पादने बनविण्यास सुरुवात केली. आज माझा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. मीनल गुरव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.