मुबारक उमरअली सैय्यद, डॉ.अरविंद थत्ते, पियुष शहा यांना कै.धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
पुणे, 25/8/2019 : धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा कै.धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार यावर्षी भंडारा जिल्ह्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे मुबारक उमरअली सैय्यद यांना दिला जाणार आहे. रुपये २५ हजार आणि मानचिन्ह असे मुख्य पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच पुण्यातील प्रख्यात हार्मोनियम वादक डॉ.अरविंद थत्ते आणि पुण्यातील साईनाथ मंडळ ट्रस्टचे गणेशोत्सव कार्यकर्ते पियुष शहा यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रुपये ११ हजार आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.
दिनांक २६ आॅगस्ट २०१९ रोजी कै. धनंजय थोरात यांची १२ वी पुण्यतिथी आहे.
मुख्य पुरस्काराचे मानकरी मुबारक उमरअली सैय्यद हे भंडारा जिल्ह्यातील खराशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. खराशी हा भंडारा जिल्हयाच्या नक्षलग्रस्त भागातील ९०० लोकसंख्या असलेला भाग असून तेथील शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना ज्ञानदानाचे कार्य ते करीत आहेत. त्यांच्या शाळेची ओळख जिल्ह्यातील पहिली डिजीटल व सेमीइंग्रजी शाळा म्हणून आहे. ग्रामीण आदिवासी भागात मुलांना उत्कृष्ट शिक्षण कसे देता येईल, यासाठी महाराष्ट्रभर अनेक गावांना भेटी देऊन ते मार्गदर्शन करीत असतात.
पुरस्काराचे दुसरे मानकरी डॉ.अरविंद थत्ते हे पुण्यातील असून गेली ४५ वर्षे संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी हार्मोनियममध्ये श्रुती हार्मोनियम नावाने सन १९८७ मध्ये वाद्य तयार केले आहे. तसेच संगीतामधील मुलभूत संशोधनाचा अंतर्भाव असलेले संगीत विमर्श हे त्यांचे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे. प्युअर मॅथेमॅटिक्समध्ये त्यांनी पीचडी मिळविली असून आजपर्यंत एक ते दीड हजारहून अधिक कार्यक्रमांत एकल सादरीकरण व दिग्गजांना देश-परदेशात झालेल्या कार्यक्रमांत साथसंगत केली आहे.
पुरस्काराचे तिसरे मानकरी पुण्यातील बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियुष शहा हे युवा गणेशोत्सव कार्यकर्ते आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून विशेषत: २००३ सालापासून विविध सामाजिक प्रबोधनपर कार्य करण्यात मंडळाच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला आहे. प्रतिवर्षी १०० उपक्रम याप्रमाणे गेल्या ८ वर्षात ८०० हून अधिक सामाजिक उपक्रम त्यांनी मंडळाच्या माध्यमातून राबविले आहेत. गणेशोत्सवात देखाव्यांमध्ये जिवंत देखाव्यावर भर देण्याचा प्रयत्न मंडळातर्फे केला जातो.
पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दिनांक १ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता नवी पेठेतील एस.एम.जोशी सभागृह येथे होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार असून कार्यक्रमाला प्रख्यात तबलावादक तालयोगी पं.सुरेश तळवलकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.