भाटघर उपकेंद्राद्वारे भोरसह 60 गावांचा वीजपुरवठा पूर्ववत
बारामती, दि. 8 आॅगस्ट 2019 : भाटघर धरणालगत महापारेषणचे 132/22 उपकेंद्र गुरुवारी (दि. 8) सकाळी कार्यान्वित झाल्यानंतर पर्यायी व्यवस्थेतून सुरु असणारा भोर शहरासह 60 गावांचा वीजपुरवठा या उपकेंद्रातील वाहिन्यांद्वारे पूर्ववत करण्यात आला आहे.
भोर तालुक्यातील भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असताना महापारेषणच्या 132/22 केव्ही उपकेंद्राच्या कंट्रोल रुममध्ये पाणी शिरल्याने सोमवारी (दि. 5) सकाळी 8 च्या सुमारास उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्वच 5 वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करावा लागला होता. परिणामी भोर शहरासह 60 गावांचा वीजपुरवठा बंद झाला होता. महावितरणकडून फलटण तालुक्यातील शिंदेवाडी उपकेंद्र व नसरापूर येथील महापारेषणच्या कामथडी 132/22 केव्ही उपकेंद्र व इतर उपकेंद्रांद्वारे वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.
महापारेषणकडून भाटघर उपकेंद्राच्या नियंत्रण कक्षात शिरलेले पाणी पूर्णतः उपसण्यात आले. काही तांत्रिक बदल करण्यात आले. त्यानंतर हे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर आज सकाळी 8 ते 9 वाजेदरम्यान पर्यायी व्यवस्थेतून सुरु असणारा वीजपुरवठा या उपकेंद्रातील 5 वीजवाहिन्यांद्वारे पूर्ववत करण्यात आला.
बारामती मंडलमध्ये पूरस्थितीमुळे केडगाव, बारामती व सासवड विभागात ग्रामीण भागातील 4720 वितरण रोहित्र सुरक्षिततेचा उपाय म्हणून तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने कृषिपंपधारकांसह सुमारे 58 हजार 781 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात बंद आहे. पुराच्या पाण्याचा धोका दूर झाल्यानंतर या रोहित्रांद्वारे वीजपुरवठा पूर्ववत सुरु करण्यात येणार आहे.
पुरामुळे नादुरुस्त वीजमीटर महावितरण स्वखर्चाने बदलणार – ज्या ठिकाणी पुरामुळे महावितरणच्या ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा वीजग्राहकांचे वीजमीटर स्वखर्चाने बदलून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. राज्यात पुरामुळे अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. अशा ग्राहकांनी संयम बाळगून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
बारामती परिमंडल अंतर्गत अनेक ठिकाणी पुरामुळे घरात पाणी साचल्याने ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा ग्राहकांचे वीजमीटर महावितरण स्वखर्चाने बदलून देणार आहे. वीज मीटर बदलण्याचे काम त्या-त्या भागातील पूर परिस्थिती निवळताच करण्यात येईल.
पावसामुळे अनेक भागात बिकट परिस्थिती असून पावसाचे पाणी साचल्यामुळे वीजयंत्रणा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येतो. या काळात महावितरणच्यावतीने अभियंते, अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अशावेळी ग्राहकांनी संयम बाळगावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
