संपूर्ण महाराष्ट्रातून महायुतीचे उमेदवार विक्रमी मताधिक्याने निवडून येणार

Share this News:

पुणे: यंदा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार विक्रमी संख्येने विधानसभेवर निवडून जातील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, राज्यसभा खासदार संजय नाना काकडे, कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, योगेश मोकाटे, पृथ्वीराज सुतार, श्याम देशपांडे, आरपीआयच्या संगीता आठवले महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मा. चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही अब की बार 220 पारचा नारा दिला होता. मात्र, महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या पद्धतीत समर्थन मिळतंय, ते पाहता संपूर्ण राज्यातून महायुतीचे उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता आपली दोन आकडी संख्या वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत,” असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

कोथरूड मतदारसंघाबद़दल बोलताना ते पुढे म्हणाले की, “गेल्या पाच वर्षात कोल्हापूरचा सर्वांगीण विकास केला. त्यामुळे आज कोल्हापूरमधील जनता समाधान व्यक्त करत आहे.असाच विकास पुढच्या पाच वर्षात पुणे जिल्ह्याचा करायचा आहे. कोथरुड मतदारसंघातून मला उमेदवारी मिळाल्यापासून अनेक जण शंका व्यक्त करत होते की, हे सहज उपलब्ध होतील की नाही? पण मी जसं कोल्हापूरमध्ये सहज उपलब्ध असायचो, राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून लोकांना सहज उपलब्ध होण्यासाठी मंत्रालयासमोरचाच बंगला निवडला. त्याच प्रकारे कोथरूडकरांना मी सहज उपलब्ध असून, यासाठी मी संपूर्ण नियोजन केले आहे.”

आमदार मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षात मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यात मा. चंद्रकांतदादा यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पानशेत धरणग्रस़तांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र, मा. दादांनी केवळ दोन बैठकीत पानशेत धरणग्रस़तांचा विषय मार्गी लावला. त्यामुळे पुढील पाच वर्षात कोथरूड मतदारसंघातील सर्व प्रश्न मार्गी लागतील. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खा. गिरीश बापट म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळाले. त्यापेक्षा जास्त मताधिक्य विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून देऊन दादांना विजयी करायचे आहे. त्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेच आहेत. पण आता दिवस कमी राहिल्याने कार्यकर्ते़यांनी दिवसरात्र एक करुन काम केलं पाहिजे. प्रत्येक घरात जाऊन मतदारांना मतदानासाठी आवाहन केलं पाहिजे.”

दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल म़हसके आणि अखिल भारतीय जनता दलाचे अध्यक्ष के.जी. शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.