मोठ्या रक्कमेच्या व्यवहारावर लक्ष ठेवा विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्या सूचना
पुणे, दि. 5 : विधानसभा निवडणुकीत मोठ्या रकमेच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा, अशा सूचना निवडणूक विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांनी दिल्या.
विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक खर्च विषयीचे विविध विभाग प्रमुख व पथक प्रमुख यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, निवडणूक निरीक्षक चंदरशेखर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, निवडणूक खर्च व्यवस्थापन विभागाचे समन्वय अधिकारी अजित रेळेकर, सी-व्हिजीलचे समन्वय अधिकारी सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उप जिल्हाधिकारी सुधीर जोशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, माहिती उपसंचालक मोहन राठोड आदी उपस्थित होते.
बी. मुरलीकुमार म्हणाले, विधानसभा निवडणूक कामकाजातील सर्व पथकांनी अचूक व काटेकोर कामकाज करावे, तसेच दैनंदिन माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करावी. बैठकीमध्ये भरारी पथके, स्थिर संनिरीक्षण पथके (एसएसटी), छायाचित्रण संनियंत्रण पथक, छायाचित्रण निरीक्षण पथक अशा विविध पथकांनी आतापर्यंत आचारसंहिता अंमलबजावणी व निवडणूक खर्च विषयक तक्रारीबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. विधानसभा निवडणुकीमध्ये पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश बी. मुरलीकुमार यांनी दिले.
मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरण्यात येणारे पैसे व दारुच्या वापराला आळा घालावा यासाठी बेकायदा दारु आणि रोकड वाहतुकीवर लक्ष ठेवावे, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. पथकांनी संशयित वाहनांची तपासणी करुन अवैधरित्या वाहतूक होत असलेली रोकड, मद्य, मादक पदार्थ व तत्सम बाबी जप्त करुन संबंधितांविरुध्द योग्य ती कारवाई करावी. उमेदवारांचा निवडणूक खर्च आणि बेकायदा पैशाचा वापर याची तपासणी काटेकोरपणे करावी, असेही त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून काम करावे. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निवडणुकीच्या कामकाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध विभागांची व पथकांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. सर्व विभागप्रमुखांनी आपापल्या विभागांच्या कामकाजाची माहिती यावेळी दिली. निवडणूक आचारसंहिता कालावधीत प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या जाहिरातींना परवानगी देणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या कामकाजाची माहिती जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी दिली.
बैठकीला निवडणूक खर्च व्यवस्थापन विभाग, उत्पादन शुल्क विभाग व महसूल व पोलीस प्रशासन, सहकार विभाग, अग्रणी बँकेचे अधिकारी, पेड न्यूज व प्रसार माध्यम विभाग, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती, आचारसंहिता कक्ष अशा विविध विभागाचे व पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.