लोहगाव येथे भर दिवसा घरफोडी ; सात तोळे दागिने व रोख रक्कम चोरट्याने केली लंपास

Share this News:

4/2/2020- लोहगाव येथील पवार वस्ती, काळूराम खांदवे नगर मध्ये भर दिवसा घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्यानी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले ७ तोळे सोने, रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी अभिषेक भोसले (30) यांनी तक्रार दिली असून विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळूराम खांदवे नगर मध्ये भोसले यांची चार मजली इमारत आहे. त्या इमारतीत अभिषेक भोसले हे दुसऱ्या मजल्यावर रहातात. दोघे पती-पत्नी कामाला गेल्याने घर कुलूप लावून बंद होते.

आज दुपारच्या सुमारास चोरट्यानी बंद घराचे कुलूप काढून घरात प्रवेश केला. कपाटातील सुमारे सात तोळे वजनाचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले. भोसले हे दुपारी तीनच्या सुमारास घरी आले असता घराचा दरवाजा त्यांना उघडा असलेला दिसला. आत मध्ये गेले असता कपाटातील साहित्य विस्कटलेले दिसले. दागिने पाहिले असता, त्यांना दागिने व रोख रक्कम दिसली नाही.

भोसले यांनी तातडीने पोलीसाना माहिती दिल्यानंतर विमानतळ पोलीस घटनास्थळी आले. भोसले यांच्या तक्रारी वरून विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पूढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत. दरम्यान, लोहगाव परिसरात दिवसा घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांनी गस्त वाढवून घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी दिपक खांदवे यांनी केली आहे.