संगीतमय वातावरणात ‘मित्र महोत्सव’ साजरा

Share this News:

पुणे, दि. २५ नोव्हेंबर, २०१९ : हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील घरंदाज गायकी, अवीट सुरांचा गोडवा, अनवट रागांची मेजवानी, कधी प्रेमाने भरलेल्या सारंगीचा करुण्यामयी सूर तर कधी सतारीचा झंकार… अशा संगीतमय वातावरणात ‘मित्र महोत्सव’ साजरा झाला.

पुण्यातील मित्र फाउंडेशनच्या वतीने ‘मित्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. कर्वेनगर डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे आयोजित शनिवार, रविवार या दोन दिवसांच्या महोत्सवाचे हे ४ थे वर्ष होते. ‘मित्र फाउंडेशन’च्या वतीने २००४ सालापासून शास्त्रीय संगीत क्षेत्रातील वयोवृद्ध गुरुजनांना गौरव निधी दिला जातो. यावर्षी पं. सुधीर माईणकर यांना गौरव निधी तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आता पर्यंत तब्बल ६० जणांना हा गौरव निधी देण्यात आला असून रुपये ११ हजार असे याचे स्वरूप असते. तसेच यावेळी तालयोगी आश्रम व आवर्तन गुरुकुल येथील तरुण तबला वादकांना तबले व वैष्णवी अवधनी व मिताली यार्दे या गायिकांना पं. माईणकर यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय गोखले, भारत फोर्जच्या सुनिता कल्याणी, फ्लीटगार्डचे निरंजन किर्लोस्कर, लोकमान्य मल्टी पर्पज को.- ऑप. सो.चे सुशील जाधव, सुमाशिल्प ग्रुपच्या डॉ, अनुराधा नारळकर आदि मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवाची सुरुवात शनिवारी सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग ‘गावती’ने गायनाला सुरुवात करत ‘तुम्हारी चरण की आस लागी…’ या रचनेने रागाचा विस्तार केला. ‘हमारी पार करो साई…’ ही रचना त्यांनी यावेळी सादर केली. खास पं. भैरवनाथ भट्ट यांची रागमाला ‘हिंडोल गावत सब…’ या रचनेने त्यांनी पेश केली. त्यांनतर ‘देवा घरचे ज्ञात कुणाला…’ कट्यार काळजात घुसली मधील ‘सुरात पियाबिन छीन बिसरायी…’ हे नाट्यपद सादर केले. अखेर तराणा पेश करून त्यांनी आपल्या या मैफलीला विराम दिला. यावेळी निखिल फाटक (तबला), राजीव तांबे (हार्मोनियम), प्रसाद जोशी (पखवाज) व उद्धव कुंभार (साईड ऱ्हिदम) यांनी त्यांना साथसंगत केली. यानंतर साबीर सुलतान खान यांचे सारंगी वादन झाले. त्यांनी राग वाचस्पतीने आपल्या वादनाची सुरुवात केली. रागाचा विस्तार, आलाप, झाला, जोड झाला यालाही रसिकांनी वाह वा ची दाद देत समेवर ताल धरला. मींड ला रसिकांची विशेष दाद मिळाली. त्यांना रामदास पळसुले यांनी तबल्याची साथसंगत केली.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची (दि. २४) सुरुवात जयपूर-अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका मंजिरी असनारे केळकर यांच्या गायन झाली. त्यांनी राग ‘गौरी’ने आपल्या गायनास सुरुवात केली. ‘राजन आये हमारे डेरे …’ या रचनेने रागाचा विस्तार करत द्रुत तीन तालात ‘सुरत मोहि मोरे मोहन की…’ ही रचना त्यांनी सादर केली. राग ‘नट कामोद’ हा जोड राग त्यांनी यावेळी पेश केला. अखेर राग काफी मधील ‘वे परिदान झुके झुक मुखडा’ हा टप्पा गाऊन त्यांनी आपल्या मैफलीचा समारोप केला. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), संजय देशपांडे (तबला) यांनी साथसंगत केली. महोत्सवाचा समारोप जगविख्यात सतार वादक पंडित रविशंकर यांचे शिष्य सुप्रसिद्ध सतार वादक नीलाद्रीकुमार यांच्या वादनाने झाली. त्यांनी यावेळी शुद्ध कल्याण रागात झपताल सादर केला. त्यांच्या आजोबांनी शिकवलेली झिंझोटी रागातील रचना यावेळी त्यांनी सादर केली. राग भैरवीने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. यावेळी त्यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य व पुत्र सत्यजित तळवलकर यांनी तबल्याची साथसंगत केली.