महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर असोसिएशन व जीएसटी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘सबका विश्वास’ योजनेच्या खास कार्यक्रमाचे आयोजन

Share this News:

22/11/2019, पुणे: जीएसटी विभागाने ‘सबका विश्वास’ योजना आणली आहे. या योजने अंतर्गत प्रलंबित प्रकरणे ही व्याज, दंड व खटला यातून संपूर्ण सुट मिळणार असून, करातदेखील मोठी सवलत ३१ डिसेंबर पुर्वी मिळणार असल्याची माहिती सीजीएसटीच्या उपायुक्त हिमानी धमिजा यांनी दिली.

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन मधील सदस्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपायुक्त धमिजा मार्गदर्शन करत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, करचुकवेगिरीच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्यात आलेले, ज्यांना परताव्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे अशा करदात्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजने अंतर्गत सर्व प्रलंबित प्रकरणांत दिलासा मिळणार आहे. यामध्ये कोणतेही व्याज अथवा दंड नसून संपुर्ण सूट मिळण्याबरोबरच करात देखील मोठी सवलत मिळणार असल्याची माहिती उपायुक्त हिमानी धमिजा यांनी दिली. तसेच जास्तीत जास्त करदात्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी धमिजा यांनी केले.

यावेळी सीजीएसटी अधिक्षक समिर कुमार, निरिक्षक गौतम तसेच महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, उपाध्यक्ष संजय देशमुख, माजी अध्यक्ष संजय कुलकर्णी, खजिनदार राजेश मुथा, उपाध्यक्ष अनिल बैकेरीकर, मुकुंद कमलाकर, सुभाष घोटीकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन संजय देशमुख यांनी केले.

सीजीएसटी अधिक्षक समिर कुमार म्हणाले कि, थकीत करासंबंधी स्वच्छेने घोषणा करदात्यांकडून केली जाणे अपेक्षित असून, प्रत्येक प्रकरणागणिक थकीत कराच्या रकमेतून ४० टक्के ते ७० टक्के इतकी सवलत या अभय योजनेमार्फत दिली जाणार आहे. शिवाय थकीत रकमेवर व्याज आणि दंडात्मक शुल्कातून सवलत प्रस्तावित केली गेली आहे. या योजनेची सविस्तर माहिती जीएसटी व सेंट्रल एक्साइज विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती अधिक्षक कुमार यांनी दिली.