पुण्यातील २ बांधकाम कामगारांची ‘डॅनिश टॅलेंट कँप’ या बांधकाम कौशल्यविषयक स्पर्धेत भरारी

Share this News:

पुणे, ८ जुलै, २०१९ : पुण्यातील रमजान मोमीन आणि मोहम्मद राबिथ कुन्नमपल्ली या बांधकाम कामगारांनी डेन्मार्कमध्ये नुकत्याच झालेल्या ‘डॅनिश टॅलेंट कँप’ स्पर्धेत आपली चमक दाखवली आहे. ‘क्रेडाई पुणे मेट्रो’च्या ‘कुशल’ उपक्रमाअंतर्गत बांधकाम कौशल्याचे विशेष प्रशिक्षण घेतलेल्या रमजान मोमीन व मोहम्मद राबीथ कुन्नमपल्ली यांनी या स्पर्धेत विटांचे बांधकाम, भिंत बांधणी आणि फरशीकामात अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक पटकावला. हे दोन्ही विजेते आता रशियातील कझानमध्ये होणा-या ‘वर्ल्ड स्किल्स’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व  करणार आहेत.

रमजान मोमीन व मोहम्मद राबीथ कुन्नमपल्ली यांनी ‘डॅनिश टॅलेंट कँप’ स्पर्धेत डेन्मार्क, रशिया, युनायटेड किंग्डम आणि इतर युरोपीयन देशांमधील बांधकाम कामगारांशी टक्कर देऊन उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले. ‘कुशल क्रेडाई पुणे मेट्रो’चे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ यांचे विशेष मार्गदर्शन त्यांना मिळाले होते.

श्रॉफ म्हणाले, ‘‘रमजान मोमीन व मोहम्मद राबीथ कुन्नमपल्ली हे दोघेही ‘वर्ल्डस्किल्स’ या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व  करणार असल्याने त्या स्पर्धेसाठीची पूर्वतयारी म्हणून ‘डॅनिश टॅलेंट कँप’ स्पर्धेतील त्यांच्या सहभागासाठी आम्ही आग्रही होतो. या स्पर्धेतून जागतिक स्पर्धांमधील वातावरण आणि देशोदेशीच्या स्पर्धकांचे बांधकामातील कौशल्य पाहण्याची चांगली संधी त्यांना मिळाली आणि आणखी चांगली तयारी करण्यासाठी प्रोत्साहन देखील मिळाले. हे दोघेही ‘वर्ल्डस्किल्स’ स्पर्धेत भारताचे नाव उंचावतील याची मला खात्री असून क्रेडाईच्या ‘कुशल’ उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहू.’’