समस्या सुटत नसतील तर थेट माझ्याशी संपर्क साधा : पोलीस आयुक्त पद्मनाभन

पिंपरी, 25 ऑगस्ट 2019 : महिलांची छेडछाड, गुंडगिरी, चो-यामा-या यांसह गुन्हेगारी विषयक समस्या कंट्रोल रुम अथवा चौकींमध्ये कळवूनही त्या सुटत नसतील तर तुम्ही जबाबदरीने माझ्याशी संपर्क साधा. तुमच्या समस्या तर सुटतीलच, पण बेजबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांवर देखील कारवाई केली जाईल, अशी सूचना पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी नागरिकांना केली.
यावेळी सोसायट्यांमध्ये राहत असलेल्या नागरिकांचा मुक्त संवादाला उत्तम प्रतिसाद मिळाला. रहिवाशांनी आपापल्या सोसायटींमध्ये भेडसावत असलेल्या गुन्हेगारी व असुरक्षीततेबाबतच्या समस्या मांडल्या. आयुक्त पद्मनाभन यांनी नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला खेळीमेळीत उत्तरे दिली.
माझे नाव असणा-या वाहनांवर देखील कारवाई करा – आमदार महेश लांडगे
चिखली, मोशी भागातील 165 सोसायट्या मिळून फेडरेशनची निर्मिती झाली आहे. या सोसायट्यांमध्ये राहणा-या महिला भगिनी नोकरीनिमित्त बाहेर जातात. नोकरी करून परतल्यानंतर त्यांना रस्त्यावर सोडले जाते. अशावेळी महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार घडतात. त्याला आळा बसला पाहिजे. कुदळवाडीत भंगारची दुकाने आहेत. त्याठिकाणी अवैध धंदे चालतात. अक्षरशः रस्त्यांवर दारू, ताडी, घावटी दारू विक्री होते. हे धंदे बंद झाले पाहिजेत. चिखली ते मोशी या मुख्य रस्त्याला जोडणा-या अंतर्गत रस्त्यांवर बेकायदेशीर मोठी वाहने लावली जातात. या अंतर्गत रस्त्यांवर नो पार्किंग झोन तयार करा. त्याठिकाणी कोणाचीही गाडी लावलेली आढळल्यास त्यावर कारवाई करा. माझे नाव गाडीवर लिहिलेले असेल तर त्या गाडीवर देखील कारवाई करा, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी पोलीस आयुक्त पद्मनाभन यांना केल्या.