पावसामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडित

Share this News:
पुणे दि. ४ ऑगस्ट २०१९ : पुणे शहर, पिंपरी चिंचवड महानगर पालिका भागातील तसेच पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात मुसळाधार पावसामुळे व धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे खबरदारी म्हणून काही भागातील वीज पुरवठा महावितरणला आज सकाळपासून बंद ठेवावा लागला.
प्राप्त माहितीनुसार आज सकाळपासून पुणे महानगर पालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नद्यांमध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने सखल भागात पाणी साचले. नागरिकाच्या सुरक्षेसाठी काही भागातील विजयंत्रणा सकाळपासून बंद ठेवण्यात आली. त्याप्रमाणे काही भागात वीज वाहिनीवर झाडे पडल्याने व फिडर पिलर मध्ये पाणी शिरल्याने वीज पुरवठा बंद ठेवावा लागला.
मुळा, मुठा, पवना व रामनदी नदीकाठी असलेल्या काही सखल भागात पाणी साचल्यामुळे वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला. औध, बोपोडी, बावधन, बाणेर, बालेवाडी, मधुबन कॉलोनी, जुनी संघवी, वाकड गावठाण, कस्पटे वस्ती, पवनानगर, चिंचवड, पिंपळे निलख, कासारवाडी, काळेवाडी, शिवतीर्थ, इ.भागातील काही वस्त्यांमधील रोहित्रे पाण्याखाली आल्यामुळे तेथील वीज पुरवठा नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंद ठेवावा लागला.
जिल्हा प्रशासनाने पुढील ४८ तासात मुसळधार पाऊस होणार असल्याचे कळविले असून महावितरणला नागरिकाच्या सुरक्षेतेसाठी योग्य ती काळजी घेण्याचे आदेश दिलेले आहेत. तेंव्हा ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आहवान पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री सचिन तालेवार यांनी केले आहे.