कोल्हापूर व सांगलीतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे युध्दस्तरावर प्रयत्न; काही भागात वीजपुरवठा सुरू

Share this News:

मुंबई,दि १२ ऑगस्ट २०१९ : कोल्हापूर व सांगली येथे आलेल्या महापुरामुळे विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने युध्दस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. पुरामुळे नादुरूस्त झालेले वितरण रोहित्र, उच्चदाब व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, विजेचे खांब व इतर आवश्यक उपकरणे व यंत्रसामुग्री या दोन्ही जिल्ह्यात पोहोचली आहे.

 

या महापुरामुळे वीज वितरण यंत्रणा मोठ्या प्रमाणात बाधीत झाली असून यात रोहित्र, उपकेंद्र, उच्चदाब व लघुदाब वाहिन्या व इतर वीजयंत्रणा पाण्यात बुडाल्याने व कर्मचारी व अधिकारी वीजपुरवठा सुरू करण्याच्या कामास प्राधान्य देत असल्यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाले नाही. सध्या अंदाजाप्रमाणे किती  नुकसान झाले हे ठरविण्यात आले आहे. महापुराचे पाणी ओसरल्यानंतर सर्व वीज उपकरणांची चाचणी घेण्यात येईल. त्यानंतरच किती उपकरणे नादुरूस्त झाली याची माहिती उपलब्ध होईल.

 

तरीपण ताबडतोब वीजपुरव सुरू करण्यासाठी ऊर्जा रोहित्र (पॉवर ट्रान्सफॉर्मर), वितरण रोहित्र, विजेचे खांब, केबल्स, कंडक्टर्स व इतर साहित्य हे इतर परिमंडलांमधून उपलब्ध करून घेण्यात आले आहे. याशिवाय काही उपकरणे व साहित्याची तातडीने खरेदी करून दोन्ही जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. विविध परिमंडलातून काही अधिकारी व कर्मचारी अशा प्रकारचे साहित्य घेऊन कोल्हापूर व सांगली या शहरांच्या वेशीवर दाखल झाली आहेत. परंतु, रस्त्यावर असलेल्या पाण्यामुळे त्यांना शहरात प्रवेश करता येत नाही.

 

कोल्हापूर व सांगली येथील बऱ्याच भागातील पुराचे पाणी अजूनही ओसरलेले नसून ज्या भागातील पुराच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे, अशा भागातील वीजपुरवठा सुरू करण्यात येत आहे. या दोन्ही जिल्ह्यातील वीजपुरवठा तातडीने सुरू करता यावा यासाठी महावितरणच्या पुणे, औरंगाबाद, जळगाव, बारामती, नांदेड व लातूर परिमंडलातील कुशल तांत्रिक कामगार आपल्याकडे असलेल्या उपकरणे व सामुग्रीसह रवाना झाली आहेत. कोल्हापूर शहरातील ३३/११ केव्ही दुधाळी उपकेंद्राचा वीजपुरवठा रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वा.सुरू करण्यात आला. महावितरणच्या ५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी दिवसभर प्रयत्न करून उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरू केला. काल दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यातील सहा उपकेंद्र सुरू करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख २२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. सांगली शहरासह जिल्ह्यातील दीड लाख ग्राहकांचा वीजपुरवठा महापुरामुळे विस्कळीत झाला असून काल सांगली शहरातील मिरज जॅकवेल व सांगलीवाडीसह अनेक भागातील ३८ हजार २२६ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला असून प्रकाश्‍ ॲग्रो व मांगले या दोन उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.