भोर शहरासह 37 गावांचा वीजपुरवठा सुरू

Share this News:

बारामती, दि. 6 आॅगस्ट 2019 : भाटघर धरणालगतच्या महापारेषणच्या उपकेंद्रात पाणी शिरल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेला भोर शहरासह 37 गावांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला आहे. दरम्यान उपकेंद्रातून वीजपुरवठा लवकरात लवकर सुरु करण्यासाठी महानिर्मिती व महापारेषणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

भोर तालुक्यातील भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असताना महापारेषणच्या 132/22 केव्ही उपकेंद्राच्या कंट्रोल रुममध्ये पाणी शिरल्याने भोर शहरासह 60 गावांचा वीजपुरवठा काल बंद करावा लागला होता. त्यानंतर महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. फलटण तालुक्यातील शिंदेवाडी उपकेंद्रातून 17 किलोमीटर अंतरावरील वीजवाहिनीद्वारे पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक कामे करण्यात आली व दोन तासांच्या या कामानंतर भोर शहर तसेच भाटघर, सांगवी, वडगाव (डाळ), येवली आदींसह 13 गावांचा वीजपुरवठा सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास वीजपुरवठा सुरु करण्यात आला. तसेच नसरापूर येथील महापारेषणच्या कामथडी 132/22 केव्ही उपकेंद्र व इतर उपकेंद्रांद्वारे पर्यायी व्यवस्थेतून आणखी 24 गावांचा वीजपुरवठा आज सकाळी सुरु करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत उपकेंद्राच्या कंट्रोल रुममधील पाण्याचा 64 केव्हीए क्षमतेच्या जनित्रावरील मोठ्या पंपाद्वारे उपसा करण्यात येत आहे. तसेच भोर नगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे सहकार्य सुरु आहे. तसेच दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या उर्वरित वाड्या, वस्त्या व लहान गावांमध्ये पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.