Fire Brigade rescue deer stuck in trench

Share this News:

खोल खड्ड्यात पडलेले हरिण जवानांमुळे सुखरुप

पुणे – रविवार रात्री आठ वाजता एक हरिण वारजेतील डुक्करखिंड रस्त्यालगत असणाऱ्या डोंगराळ भागात एका खोल खड्ड्यामधे किमान वीस ते पंचवीस फुट खाली पडले होते. खड्डयामधे बऱ्याच प्रमाणात मोठी दगडे, पालापाचोळा,गवत व पाणी असल्याने त्या हरिणास बाहेर पडणे जमत नसल्याचे स्थानिकांनी पाहिले व त्यांनी प्राणी मित्र प्रतिक महामूनी यांना भ्रमणध्वनी करुन कळविले. महामूनी व वनविभागाचे कर्मचारी तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन अग्निशमन दलास पाचारण केले.

सिहंगड अग्निशमन केंद्राचे जवान ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. जवानांनी पाहिले की, हरिण जिवंत स्थितीमधे असून खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करीत तिथेच त्याची तेवढ्याच भागात धावाधाव सुरु आहे. त्याची सुटकेची बेचैनी पाहात जवानांनी रशी व जाळीच्या साह्याने त्याला वर घेण्याचा प्रयत्न केला. परंतू, हरिण भेदरलेल्या स्थितीत असल्याने त्याला जाळीमधे घेणे अवघड जात होते. पण शेवटी सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर त्याला जाळीमधे घेण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. त्याला बाहेर काढल्यानंतर त्याला काही प्रमाणात किरकोळ जखमा झाल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी जवानांनी कात्रज प्राणी संग्राहलयाशी संपर्क साधून त्यांच्याच अग्निशमन वाहनातून हरिणाला तिथे प्राणी संग्राहलयाच्या ताब्यात देऊन व तिथे उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करुन मुक्या प्राण्याचा जीव वाचविल्याचा आनंद मानला.

या साहसी कामगिरीमधे चालक भरत भुजबळ तसेच तांडेल रोहिदास दुधाणे व जवान संतोष भिलारे, सुनिल दिवाडकर, भरत गोगावले, भारत पवार यांनी सहभाग घेतला.