दापोडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ दहा लाखांची मदत करा : आमदार बनसोडे

Support Our Journalism Contribute Now

पिंपरी (4 डिसेंबर 2019) : दापोडी येथील दुर्घटनेत मृत्यू झालेले मजूर आणि जवानाच्या कुटुंबियांना तत्काळ दहा लाखांची आर्थिक मदत करण्यात यावी. तसेच या कामात बेपर्वाई करणा-या ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात मलनिस्सारणवाहिनी टाकण्याची कामे सुरु केली आहेत. त्यानुसार दापोडी येथे पाईपलाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात मजूर नादप्पा जमादार पडले. त्यांना वाचविण्यासाठी खड्डयात उतरलेले महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव यांनी प्रयत्न केला. या घटनेत मजूर जमादार व कर्तव्य बजावत असताना विशाल जाधव यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्घटना संबंधित ठेकेदाराने व मनपा अधिका-याने सुरक्षिततेच्या उपायांकडे दुर्लक्ष केल्यामुळे झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या ठेकेदारास कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे व मजूर जमादार आणि जवान विशाल जाधव यांच्या कुटुंबियांना महानगरपालिकेने तातडीची मदत म्हणून दहा लाख रूपये द्यावेत. तसेच त्यांच्या वारसांना महानगरपालिकेच्या सेवेत नोकरीस घ्यावे. घडलेल्या दुर्घटनेत महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग कुचकामी ठरला आहे.

अशा दुर्घटना भविष्यात घडू नयेत यासाठी शहरात सुरु असणा-या विकास प्रकल्पांच्या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारने आखून दिलेल्या सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे. यासाठी आयुक्तांनी गरज भासल्यास स्वतंत्र अधिका-यांची नेमणूक करावी. सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणा-या ठेकेदार व अधिका-यांवर कारवाई करावी तसेच महिन्यातून किमान एक वेळ तरी आयुक्तांनी काम सुरु असणा-या प्रकल्पांचा सुरक्षाविषयक आढावा घ्यावा. आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे अनेक अधिकारी बेजबाबदारपणे वागतात. या दुर्घटनेबाबत आपण आगामी हिवाळी अधिवेशनात विधीमंडळात प्रश्न उपस्थित करू असेही आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटले आहे.

Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.